पुरंदरचं प्रस्तावित विमानतळ बारामतीला हलवण्याचा पवारांचा डाव, विजय शिवतारेंचा हल्लाबोल

0 झुंजार झेप न्युज

कुठल्याही परिस्थितीत पुरंदरचं विमानतळ बारामतीला घेऊन जाऊ देणार नाही, असा इशारा विजय शिवतारे यांनी दिलाय.

पुणे : जिल्ह्यातील पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळावरुन आता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुरंदरचं प्रस्तावित विमानतळ बारामतीला हलवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केलाय. मात्र, कुठल्याही परिस्थितीत पुरंदरचं विमानतळ बारामतीला घेऊन जाऊ देणार नाही, असा इशारा विजय शिवतारे यांनी दिलाय.

पुरंदरचं विमानतळ बारामतीला हलवण्याचा कुठलाही निर्णय झाल्यास जिल्ह्यात मोठं आंदोलन उभं करु असा इशारा विजय शिवतारे यांनी दिला आहे. शिवतारे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा बदलून ते बारामतीच्या सीमेजवळ नेऊन ठेवणं हे मोठं षडयंत्र आहे. विमानतळाची आधीची पारगाव आणि सात गावांची जागा बदलून नव्यानं रिसे, पिसे, पांडेश्वर आदी गावातील म्हणजे पुरंदर तालुक्यातील जागा घ्यायची आणि विमानतळाचं प्रवेशद्वार बारामतीच्या बाजूला करुन तिकडचा विकास साधायचा. मग, विमानतळाच्या मागे पुरंदरमध्ये झोपडपट्टी होणार आणि सर्वांगिण विकासाची संधी जाणार. त्यामुळे हे षडयंत्र आपण जनतेला बरोबर घेऊन हाणून पाडण्यास सिद्ध आहोत, असा इशाराच शिवतारे यांनी दिला आहे. 

प्रस्तावित विमानतळाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध

पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाला पुन्हा स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील रिसे, पिसे, राजुरी, पांडेश्वर, नायगाव, नावडी, पिंपरी या परिसरात विमानतळ होत असल्याच्या चर्चा आहेत. कोणत्याही परिस्थितीत विमानतळासाठी जमिनी देणार नाही, अशी ठाम भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी घेतली आहे. यासाठी शनिवारी राजुरी इथं सर्व शेतकऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी शेतकऱ्यांनी प्रस्तावित विमानतळाला विरोध दर्शवला आहे.

पवारांनी डिसेंबरमध्ये घेतली संरक्षणमंत्र्यांची भेट

पुण्यापासून जवळच पुरंदर येथे नवं विमानतळ स्थापन करण्याचा प्रस्ताव आता महाराष्ट्र सरकारनं मांडला आहे. प्रस्तावित विमानतळाचे काम जलदगती व प्राधान्यक्रमाने सुरू व्हावं यासाठी 9 डिसेंबर 2020 रोजी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह, संरक्षण सचिव व नागरी उड्डाण सचिव उपस्थित होते.या बैठकीचे काही फोटो स्वत: शरद पवार यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.