कोरोनासंदर्भात नाशिकमध्ये आज आढावा बैठक घेण्यात आली.
नाशिकः सरकारं येत असतात आणि जात असतात; सूडबुद्धीने कोणी काही करू नये, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणालेत. कोरोनासंदर्भात नाशिकमध्ये आज आढावा बैठक घेण्यात आली. त्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
तुम्हाला वाटतंय तेच मला देखील ईडी कारवाईबाबत वाटतंय. सरकार येत असतात, जात असतात, सूडबुद्धीने कोणी काही करू नये, असा टोलाही अजित पवारांनी भाजपला लगावलाय. राजकीय हस्तक्षेप न होता कायद्याने कारवाई झाली पाहिजे. काहींना राजकारण करायचं आहे, त्याकडे सरकार दुर्लक्ष करतंय. पार्थ पवारांच्या बाबतची बातमी धादांत खोटी आहे. भालकेंच्या जागी पार्थ पवारांचं नाव नसेल, त्यामुळे हा विषय इथे बंद करा, असंही अजितदादांनी स्पष्ट केलंय. अजित पवार यांनी शेतकरी नुकसानभरपाई, कोरोना व्हॅक्सिन ड्राय रन आणि औरंगाबाद नामांतरासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय.
केंद्राची टीम राज्यात उशिरा आली : अजित पवार
शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्राची टीम राज्यात उशिरा आली. 2-2 महिने केंद्राची टीम येत नाही. मुख्यमंत्र्यानी तात्काळ 10 हजार कोटींचं पॅकज जाहीर केल्याचा उल्लेखही अजित पवारांनी केलाय. 2021-22 चा अर्थसंकल्प लवकरच जाहीर करणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलंय.
चार जिल्ह्यांत कोरोना व्हॅक्सिनचा ड्राय रन सुरू : अजित पवार
काल काही विभागात चार जिल्ह्यांत व्हॅक्सिनचा ड्राय रन घेण्यात आला. फक्त नंदुरबारच्या एका गावात अडचण आल्यात. सरकार नेहमी बदलत असते. जनतेच्या मनात जे असतं तेच होतं. मात्र आम्ही समृद्धी महामार्ग , मेट्रोची कामं सुरूच ठेवलीयत. काम कोणी सुरू केले यापेक्षा पूर्ण होणं महत्वाचं असल्याचही अजित पवारांनी अधोरेखित केलंय. गेल्या काही दिवसांत जे प्रवासी येत आहेत त्यांना शोधून बरं करूनच सोडलं जातंय.
मदत पुनर्वसन, अन्न नागरी, पोलीस विभाग अशा महत्वाच्या विभागांच्या निधीला कात्री नाही : अजित पवार
मदत पुनर्वसन, अन्न नागरी, पोलीस विभाग अशा महत्त्वाच्या विभागांच्या निधीला कोणतीही कात्री लावण्यात येणार नाही. MTDC च्या काही अडचणीत आहेत का हे जाणून घेतल्यात. स्थानिक विकास निधीला कोणताही कट नसेल. कोरोना काळात राज्यासमोर आर्थिक अडचण आहे. जीएसटी संकलन केंद्राला दिले जात असले तरी केंद्राकडे देखील अडचणी आहेत, असंही अजित पवार म्हणालेत.
औरंगाबाद नामकरणाबाबत तिन्ही पक्षाचे नेते बसून मार्ग काढूः अजित पवार
औरंगाबाद नामकरणाबाबत तिन्ही पक्षाचे नेते बसून मार्ग काढणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलंय. मविआ सरकारमध्ये फूट पडावी, यासाठी काही जण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. साहित्य संमेलनापूर्वी सुरक्षित वातावरण व्हावं. सरकार कुणाचे ही असले तरी लस काही पक्षाची नाही. शेवटी हा माणसांच्या जीवाचा प्रश्न आहे, यामध्ये राजकारण आणू नये, असंही अजितदादा म्हणालेत.

