औरंगाबादच्या नामांतराचा वाद काही थांबताना दिसत नाही.
सोलापूर: औरंगाबादच्या नामांतराचा वाद काही थांबताना दिसत नाही. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर होणारच असं स्पष्ट केल्यानंतर आता राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. संभाजीनगर हा स्थानिकांच्या अस्मितेचा विषय आहे. सरकार तिथल्या भावनांचा आदर करणार, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे आज सोलापूरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. संभाजीनगर हा तिथल्या स्थानिकांच्या अस्मितेचा विषय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादचा नामोल्लेख संभाजीनगरच केला जातो. त्यामुळे सरकार तिथल्या लोकांच्या भावनांचा आदर करेल. जे लोकांना हवं आहे, तोच निर्णय सरकार घेणार, असं सांगतानाच नामांतराचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणण्याबाबत मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेतेच निर्णय घेतील, असं ते म्हणाले. औरंगजेबबाबत कुणाचं प्रेम असण्याचं कारणही नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी धनंजय मुंडे प्रकरणीही भाष्य केलं. मुंडे प्रकरणाचा तपास सुरू आहे. ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांच्याबाबतीतही तक्रारी आल्या आहेत. त्यावर गृहविभाग योग्य तो निर्णय घेईल, असंही त्यांनी सांगितलं.
आदित्य काय म्हणाले?
आदित्य ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबादेत कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. दुसरे पक्ष संभाजीनगरबद्दल विचारत असतात, पण त्यांनी पाच वर्षे केलं काय.? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करणार का?; असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सूचक विधान केलंय. पुढे पुढे पाहा काय होतंय..! महाविकास आघाडीचं एकमत करूनच आम्ही शहराचं नाव बदलू, पण त्यासोबतच शहराच्या विकासाचे प्रश्नही आम्ही सोडवत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
मुनगंटीवार काय म्हणाले?
आदित्य ठाकरेंनी औरंगाबादचं नामांतर केल्यास त्यांची ऊंची तरुणांच्या मनात सह्याद्रीच्या पर्वतापेक्षा मोठी होईल. संभाजी महाराज देवासोबत जिथे कुठे बसले असतील तिथून त्यांना आशीर्वाद देतील. विधानसभेत भाजपतर्फे आदित्य यांच्या अभिनंदानाचा प्रस्ताव मांडणारा आमदार मी असेन, असं भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी सांगितलं.

