प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार, राष्ट्रवादीची संवाद यात्रा, स्वतंत्र निवडणुकीबाबत जयंत पाटलांचं मोठं भाष्य

0 झुंजार झेप न्युज

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी ही आघाडी निर्माण केली आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

मुंबई : “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या पहिल्या टप्प्याला येत्या 28 जानेवारीपासून सुरुवात होईल. त्यात संपूर्ण विदर्भ आणि खानदेश असे 14 जिल्हे आणि 42 मतदारसंघाचा आढावा घेऊ, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

“प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा अजिबात विचार नाही. आम्ही महाविकास आघाडीत आहोत. भाजपला पराभूत करणं हे आमचं ध्येय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी ही आघाडी निर्माण केली आहे,” असेही जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीकडून परिवार संवाद यात्रेचे नियोजन

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि जनता ही केंद्रबिंदू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने‌ अभिप्राय अभियान राबवून डिजीटल मोहीम सुरु केली होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी ह‌ा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा काढणार आहे. या यात्रेला येत्या 28 जानेवारीपासून सुरुवात होईल.

“गडचिरोलीतील अहेरीपासून ही परिवार संवाद यात्रा काढली जाणार आहे. या यात्रेतील पहिला टप्पा हा 17 दिवस असणार आहे. त्यात संपूर्ण विदर्भ आणि खानदेश असे 14 जिल्हे आणि 42 मतदारसंघाचा आढावा घेऊ. ही यात्रा 13 फेब्रुवारीला संपेल. जवळपास ३ हजार किलोमीटरचा प्रवास राष्ट्रवादी पक्षाकडून केला जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि खान्देशात दौरा

राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि खान्देशात दौरा असेल. गडचिरोली, चंद्रपूर , भंडारा,वर्धा, अमरावती, जळगाव, धुळे, नंदूरबार, नागपूर, नांदेड इत्यादी 14 जिल्ह्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जातील. या यात्रेदरम्यान लोकांच्या समस्या जाणून घेऊ. तसेच विदर्भ आणि खानदेशातील मतदारसंघाचा आढावाही घेऊ,” असेही जयंत पाटील म्हणाले.

“त्याशिवाय 20 आणि 30 फेब्रुवारी दरम्यान मराठवाड्यातील दुसरा टप्पा जाहीर करु. तसेच उरलेले इतर टप्पे विधानसभा अधिवेशनानंतर जाहीर करू,” असेही जयंत पाटील यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.