कुणाला किती लस द्यायची याचा निर्णय केंद्राचा आरोग्य विभाग घेतो. त्यामुळे कोणत्या राज्याला किती लस दिल्या यात राजकारण करू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
मुंबई: कुणाला किती लस द्यायची याचा निर्णय केंद्राचा आरोग्य विभाग घेतो. त्यामुळे कोणत्या राज्याला किती लस दिल्या यात राजकारण करू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. मुख्यमंत्री म्हणून मला जसे देशातील सर्व नागरिक समान आहेत. तसेच पंतप्रधानांनाही देशातील नागरिक समान असतील, असावेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बीकेसी येथील कोविड सेंटरमध्ये कोरोना लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रापेक्षा पश्चिम बंगालला सर्वाधिक लस देण्यात आल्याकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावेळी कोणत्या राज्याला किती लस द्यायची याचा निर्णय केंद्राचा आरोग्य विभाग घेतो. त्यामुळे त्यात राजकारण नको. मला देशाचे संपूर्ण नागरिक समान आहेत. तसेच पंतप्रधानांनाही देशातील सर्व नागरिक समान असावेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
तर मीच लस घेतली असती
केंद्र सरकारने लस देण्यासाठी कुणाला प्राधान्य द्यायचं याच्या सूचना दिल्या आहेत. कोविड योद्धांना लस देण्यासाठी प्राधान्य देण्याच्या सूचना पंतप्रधानांनी केल्या आहेत. नाही तर मीच पहिली लस घेतली असती, असंही त्यांनी सांगितलं. राज्याला अधिकाधिक लसी येतील. जसजसं उत्पादन वाढेल तसतशा लसी येतील. एकदोन कंपन्यांच्या लसही अंतिम टप्प्यात आहेत. त्यांना मंजुरी मिळाल्यानंतर लसींचा साठा वाढेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
काळाबाजार नाहीच
कोणत्या राज्याला किती लस द्यायची यावर केंद्राचं नियंत्रण आहे. ठरलेल्या कोट्यानुसार लस दिली जात आहे. त्यासाठी नोंदणीही झालेली आहे. त्यामुळे लसींचा काळाबाजार होण्याचा प्रश्नच येत नाही, असंही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
संकट टळलेलं नाही
आज आपण क्रांतिकारी पाऊल टाकलं आहे. मात्र अजूनही संकट टळलेलं नाही. लस घेतली म्हणजे सर्व काही संपलं असं नाही. अजूनही हजारो लोकांना लस द्यायची बाकी आहे. सर्वांना लस देण्यासाठी काही महिने लागणार आहेत, असं सांगतानाच लस घेतल्यानंतरही मास्क वापरावाच लागणार आहे. मास्क लावणं, हात धुणं आणि अंतर ठेवणं या त्रिसूत्रीद्वारे आपण कोरोनावर मात केली आहे. ही त्रिसूत्री कायम पाळा, असं आवाहनही त्यांनी केलं.

