नाव बदलून शहरांचा विकास होत नसतो, त्यामुळं राजकारण करु नये, पण… : प्रवीण दरेकर

0 झुंजार झेप न्युज

भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर औरंगाबाद नामांतराच्या विषयावरुन सडकून टीका केलीय.

पुणे : भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर औरंगाबाद नामांतराच्या विषयावरुन सडकून टीका केलीय. नाव बदलून शहरांचा विकास होत नसतो. त्यामुळे नामांतरावरुन राजकारण करुन नये, पण संभाजीनगरचा विषय वेगळा आहे, असं मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीकही हजर होते.

प्रवीण दरेकर म्हणाले, “संभाजीनगरच्या बाबतीत शिवसेनेनं भूमिका स्पष्ट करावी. शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. सरकार हवं की अस्मिता हे शिवसेनेनं स्पष्ट करावं. संजय राऊत यांना शहराच्या नामकरणाची प्रकिया माहिती नसावी. नाव बदलून शहरांचा विकास होत नसतो. त्यामुळं नामांतरावरुन राजकारण करु नये, पण संभाजीनगरचा विषय वेगळा आहे.”

“ईडी ही स्वायत्त संस्था आहे. ईडीच्या कार्यालयात कोणीही जाऊ शकतं. लोकशाहीत असलेल्या व्यवस्थेला आव्हान दिलं जात आहे. हे घातक आहे. खडसे अजून सीडी शोधतायेत. लोकांना धमक्या दिल्या जात आहेत. मराठा आरक्षण, अतिवृष्टी यावर रस्त्यावर कोणी बोलत नाही. गृहमंत्री पुण्यात येऊन सुद्धा पुण्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यावरून त्यांचा पोलिसांवर किती वचक आहे हे दिसून येतं. या सरकारला जनतेच्या विकासाकडं लक्ष द्यायला वेळ नाही. फक्त सरकार टिकवण्याची धडपड करावी लागत आहे,” असंही प्रवीण दरेकर यांनी नमूद केलं.

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, “भासा आसखेडवरुन आम्ही श्रेयवादाचं राजकारण करत नाही. ज्यांनी उद्घाटनाच्या दिवशी फ्लेक्स लावले त्यांना क्रेडिट घ्यायचं आहे. पण त्यांनी भामा आसखेडसाठी निधी दिलेला नाही. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन 23 गावांचा समावेश महापालिका हद्दीत करण्यात आलाय. त्या गावांचा विकास राष्ट्रवादीला करता आलेला नाही. या गावांच्या विकासासाठी राज्य सरकारने महापालिकेला मोठा निधी द्यावा.”

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.