गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरुन टीकास्त्र सोडलं आहे.
मुंबई: भाजप नेते गिरीश महाजन यांनी कायदा सुव्यवस्था, कॅबिनेटला मंत्र्यांची गैरहजेरी या मुद्यांवरुन टीका केली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांना कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित राहाण्यासाठी मंत्र्यांना तंबी द्यावी लागत असेल, तर परिस्थिती गंभीर आहे, असा आरोप महाजन यांनी महाविकासआघाडीवर केला आहे. राज्य सरकारमध्ये आंधळ दळत आणि कुत्र पीठ खातेय, अशी परिस्थिती असल्याचं टीकास्त्र गिरीश महाजन यांनी केले आहे.
राज्य मंत्रिमंडळाची 20 जानेवारीला बैठक झाली होती. त्या बैठकीला मंत्र्यांच्या गैरहजेरीवरुन अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. अजित पवारांच्या नाराजाचीचा संदर्भ पकडत राज्यातील मंत्री कॅबिनेट विषयी गंभीर नाहीत, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला. राज्य सरकारची परिस्थिती आंधळ दळत आणि कुत्र पीठ खातय, अशी स्थिती राज्य सरकारमध्ये असल्याचं महाजन म्हणाले.
गृहमंत्री अनिल देशमुखांना टोला
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येत्या काही काळाता भाजप नेते पक्ष सोडणार असल्याचं म्हटलं होते. भाजपचा कोणताही नेता कुठेही जाणार नाही. अनिल देशमुख यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य द्यावं,असा टोला गिरीश महाजनांनी लगावला आहे.
अण्णा हजारेंची भेट घेणार
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 30 जानेवारीला दिल्लीत केंद्र सरकारविरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला होता. अण्णा हजारेंची कोरोना विषाणू संसर्गामुळे भेट झाली नाही. मात्र, लवकरच अण्णा हजारेंना भेटणार आहे. मी किंवा देवेंद्र फडणवीस हे देखील अण्णा हजारेंची भेट घेऊ, असं गिरीश महाजन म्हणाले. अण्णा हजारेंच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ज्या मागण्या असतील त्यासंदर्भात केंद्रातील अधिकारी आणि केंद्रीय मंत्री यांची अण्णा हजारेंसोबत चर्चा घडवून आणणार आहे. अण्णा हजारेंनी वयाचा विचार करता उपोषणाचा निर्णय घेऊ नये, असं गिरीश महाजन म्हणाले.
अनिल देशमुख काय म्हणाले?
महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर राज्यातील हवा बदलली आहे. भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या संपर्कात भाजप नेते आहेत.पुढील काळात अनेक भाजप नेत्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेत जिथं जायचं आहे, तिथं प्रवेश मिळणार आहे, असंही अनिल देशमुख म्हणाले.

