राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्नेह केवळ आणि केवळ सत्तेशी आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
पंढरपूर: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्नेह केवळ आणि केवळ सत्तेशी आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य करत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या मुद्द्यावरूनही आघाडी सरकारवर टीका केली. राज्यपालांना विमानातून उतरवणे हा पोरखेळ आहे. हा घटनात्मक पदाचा अवमान आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंजुरीसाठी फाईल गेली होती. पण त्यांनी बाजूला ठेवली. कायदा सर्वांना सारखा आहे, असं दरेकर म्हणाले.
कोणत्याही नेत्याविषयी चुकीची भाषा वापरता कामा नये. आमच्या कार्यकर्त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे. मात्र फडणवीस दाम्पत्यावर अश्लील भाषेत टीका केली जातेय, त्याचे काय? असा सवाल करतानाच खालच्या स्तरावर टीका होऊनही आम्ही कुणाला मारहाण केली नाही. यापुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
पडळकरांच्या भावना समजून घ्या
दरेकर यांनी यावेळी गोपीचंद पडळकरांची पाठराखण केली. पडळकरांच्या भावना समजून घ्या. अहिल्याबाई होळकरांच्या स्मारकाचं उद्घाटन रखडलं म्हणून त्यांनी उद्घाटन केलं. यापूर्वीही अनेक उद्घाटने झाली. पण गुन्हे दाखल झाले नाहीत, असं ते म्हणाले. तीन पक्षांची सत्ता आहे. या तिन्ही पक्षाची वेगवेगळी मते आहेत, असं सांगतानाच महाविकास आघाडीची सत्ता किती दिवसाची? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
आरक्षण सोडत चुकीची
राज्यातील सरपंचच्या आरक्षणाची सोडत चुकीची आहे. महाविकास आघाडीचे उमदेवार निवडून यावेत म्हणून निर्णय बदलले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच राज्यभर वीज तोडणीच्या विरोधात रान पेटवणार असून सरकारला वठणीवर आणण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच पूजा चव्हाण प्रकरणाची सत्यता पुढे आली पाहिजे, असंही ते म्हणाले.

