भोसरीत उमेदवारीवर आमदारांचा हस्तक्षेप थांबवा – भाजपा कार्यकर्त्यांची मागणी

0 झुंजार झेप न्युज

“निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यावे; नातेवाईक व आयात कार्यकर्त्यांना उमेदवारी नको”

पिंपरी–चिंचवड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली असतानाच भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना तीव्र झाली आहे. या मतदारसंघातील उमेदवार निवड प्रक्रियेत आमदारांचा कथित हस्तक्षेप, पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या, नातेवाईक अथवा आमदार समर्थकांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघात सुमारे ४८ प्रभागांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. पक्षांतर्गत या प्रभागांसाठी उमेदवारांची निवड करताना पारदर्शकता, सामूहिक निर्णय आणि प्रामाणिक मूल्यांकन यांना प्राधान्य द्यावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र प्रत्यक्षात आमदारांची पसंती, त्यांचे जवळचे कार्यकर्ते किंवा नातेवाईक यांनाच उमेदवारीचे पत्र देण्याचे प्रयत्न सुरू असून, मुलाखत प्रक्रियेची केवळ औपचारिकता केली जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.

भोसरीतील जेष्ठ पदाधिकारी, माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षाशी दशके जोडलेले असलेले कार्यकर्ते हे अगदी शेवटच्या क्षणी बाजूला सारले जात असल्याचे चित्र दिसत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. २०१४ च्या निवडणुकीत आमदार लांडगे यांनी अपक्ष म्हणून निवडून येताना पक्ष संघटनेतील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवाराला साथ दिली होती, हेही कार्यकर्ते लक्षात आणून देत आहेत.

“त्या काळात कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठा सोडली नव्हती; परंतु आज त्याच कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. हा अन्याय थांबवावा,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कार्यकर्त्यांनी असा आरोपही केला आहे की, मुलाखत समितीचा उद्देश केवळ दिखावा असून, मुलाखतींच्या नावाखाली फक्त निकषांचे औपचारिक पालन केले जाते. प्रत्यक्ष यादी आधीच तयार असल्याने त्यात नातेवाईक, आयात कार्यकर्ते आणि आमदार समर्थकच पुढे येत आहेत. अशावेळी पक्षाच्या कोअर कमिटीने हस्तक्षेप करून प्रक्रिया पारदर्शक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

भोसरीतील भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी या संदर्भात राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य संघटन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील वरिष्ठ पदाधिकारी यांना निवेदन दिल्याचे सांगितले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उमेदवारी निवड प्रक्रिया कोअर कमिटी, शहर अध्यक्ष, प्रभाग निरीक्षक, पक्षाचे सर्व आमदार-खासदार, जेष्ठ आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सामूहिक चर्चेनंतरच होणे आवश्यक आहे. मुलाखती संपल्यानंतर उमेदवारीची घोषणाही संयुक्तपणे करावी, जेणेकरून मतदारसंघातील पक्ष संघटना सुदृढ राहील.

“आम्हाला प्रमोशन वा पद नको; मेहनतीचा सन्मान हवा. आयात कार्यकर्त्यांना किंवा अचानक येऊन पक्षाशी स्वतःला जोडणाऱ्यांना प्राधान्य देणे योग्य नाही,” असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या हस्तक्षेपामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास खचतो. निवडणुकीत प्रचार, संघटनात्मक कामे, बुथ बांधणी, जनसंपर्क ही कामे वर्षानुवर्षे करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बदनामी होतो आणि पक्षाबद्दल असंतोष निर्माण होतो.

निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यास, भविष्यात त्यांच्या मनात पक्षाबद्दलचा विश्वास कमी होईल आणि आगामी निवडणुकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी सूचनाही निवेदनात करण्यात आली आहे.

भोसरीतील कार्यकर्ते, माजी पदाधिकारी व जेष्ठ कार्यकर्त्यांनी एकमुखाने पक्ष नेतृत्वाकडे अपेक्षा व्यक्त केली आहे की, नातेवाईकवाद, गटबाजी व शिफारस संस्कृती रोखून निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व दिल्यास पक्ष अधिक मजबूत होईल.

यापुढे उमेदवारीत आमदारांचा हस्तक्षेप नको आणि निवड प्रक्रियेचे निर्णय एकत्रित चर्चेने घ्यावेत, अशी मागणी करून पक्ष नेतृत्वाने लक्ष घ्यावे, असा पुनरुच्चार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.