मनरेगा रोजगार निर्मितीत अमरावती जिल्हा राज्यात पहिला, लॉकडाऊनमध्ये 240 कोटींचा खर्च

0 झुंजार झेप न्युज

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे रोजगारनिर्मितीत अमरावती जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. 

अमरावती: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे रोजगारनिर्मितीत अमरावती जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. 2020-21 या वर्षात अमरावती जिल्ह्यात 96 लक्ष 51 हजार मनुष्यदिन रोजगारनिर्मिती झाली आहे. पालघर जिल्ह्यात 46 लक्ष 69 हजार मनुष्यदिन, तर गोंदिया जिल्ह्यात 45 लक्ष 98 हजार मनुष्यदिन निर्मिती होऊन ते अनुक्रमे दुस-या व तिस-या क्रमांकावर राहिले आहेत.

लॉकडाऊनमध्ये मनरेगाचा आधार

मागील वर्षी कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर लॉकडाऊन झाले. शहरांत अनेक कामे बंद झाल्याने नागरिक गावोगाव परतून मेळघाटसह ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. या काळात स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करण्यात ‘मनरेगा’ने मोलाची भूमिका बजावली. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीची गरज लक्षात घेऊन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी वेळोवेळी बैठका घेतल्या व जलसंधारण, रस्तेविकासाच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले.

गावपातळीवरील कामाची गरज व त्यातून विविध विकासकामांना चालना यांचा सर्वंकष विचार करून सूक्ष्म नियोजन करण्याबाबत स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या नियोजनात शेततळे, ढाळीचे बांध, वनतळे, वृक्षलागवड, रोपवाटिका, घरकुल, सिंचन विहीर, सार्वजनिक विहीर अशा अनेक कामांचा समावेश करण्याची सूचना केली. त्यामुळे गेल्या एप्रिलपासून मोठी रोजगारनिर्मिती व्हायला सुरुवात झाली.

विविध योजनांची मनरेगाशी सांगड घालणार

जिल्ह्यात गत वर्षभरात 96.51 लक्ष मनुष्यबळदिन निर्मिती झाली. या योजनेत मजुरीवाटप आदी कामे वेळेत केल्याने खर्चातही जिल्हा आघाडीवर राहिला. 240 कोटी 61 लाख 51 हजार खर्च करण्यात आला आहे. कोरोना साथ लक्षात घेऊन एप्रिलपासून अधिकाधिक रोजगारनिर्मितीवर भर दिला. एप्रिलमध्ये सुरुवातीला दैनिक मजूर उपस्थिती 19 हजार 346 होती. तीत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन ती मे महिन्यात 96 हजार 930 पर्यंत एवढी झाली. आता विविध योजनांची मनरेगाशी सांगड घालून अभिसरणातून कामे राबविण्यात येणार असल्याचेही उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.