45 वर्षाखालील ज्यांना डायबिटीजसारख्या अन्य व्याधी आहेत, त्यांना कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे.
बारामती : 25 वर्षावरील ज्यांना सहव्याधी आहेत, अशा नागरिकांनाही कोरोना लस उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी लवकरच राज्य सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते आज बारामतीत कोरोना आढावा बैठकीत बोलत होते.
कोव्हिड लस कोणाला द्यायची, हा निर्णय सर्वस्वी केंद्र सरकार घेत असतं. 1 एप्रिल पासून 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. तरी 45 वर्षाखालील ज्यांना डायबिटीजसारख्या अन्य व्याधी आहेत, त्यांना कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे.
मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींना विनंती करणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांना 25 वर्षावरील सहव्याधीग्रस्तांनाही लस उपलब्ध देण्याची विनंती करणार आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीत दिली.
पुण्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरणाची मागणी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुण्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लसीकरणाची परवानगी द्यावी, अशी इच्छा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांनी व्यक्त केली होती. पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता पुणे जिल्ह्यातील भाजप खासदार गिरीश बापट, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला प्रस्ताव सादर करावा, अशी विनंती अजित पवारांनी केली होती.
येत्या एक एप्रिलपासून 45 वर्ष वयोगटावरील प्रत्येकाला कोरोनाची लस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. 45 वर्षांवरील प्रत्येकाने लसीकरणासाठी नोंदणी करावी, असं आवाहन जावडेकरांनी केलं. आतापर्यंत केवळ सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोना लस दिली जात होती.
“मला फोटो काढण्याची नौटंकी आवडत नाही”
लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी अनेक नेते सोशल मीडियावर फोटो टाकतात. पण माझा फोटो टाकला तर जे लोक येणार आहेत, तेदेखली लस घेण्यासाठी फिरकणार नाही, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मला लस घेताना फोटो काढण्याची नौटंकी आवडत नाही. इतर नेते कदाचित लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी लस घेतानाचे आपले फोटो शेअर करत असतील. पण मी लस घेतानाचा माझा फोटो टाकला तर लोक अजिबात लसीकरणासाठी फिरकणार नाही, असे अजित पवार म्हणाले होते.

