हरीसाल येथील महिला वन अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात खासदार नवनीत राणा काल चांगल्याच भडकल्याच पाहायला मिळालं.
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या हरीसाल येथील महिला वन अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी DFO विनोद शिवकुमार यांना 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश धारणी न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात खासदार नवनीत राणा काल चांगल्याच भडकल्याच पाहायला मिळालं.
झालं असं की, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या श्रीनिवासा रेड्डी यांची कार्यालयातील काही महिला कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्यांना खासदार नवनीत राणा यांच्याकडे आपल्या बचावासाठी निवेदन घेऊन पाठविले. पण खासदार नवनीत राणा यांनी या महिला निवेदनाकर्त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. महिला असून सुद्धा आपण महिलेची बाजू न घेता, रेड्डी सारख्या अधिकाऱ्यांची बाजू घेत असल्याबद्दल संताप व्यक्त केला. तसंच निवेदन स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. याआधी कार्यालयातील पुरुष कर्मचाऱ्यांनी नवनीत राणा यांची आज सकाळी भेट घेऊन रेड्डीना आमचा पाठिंबा नसल्याचे सांगितले आणि रेड्डी सारख्या अधिकाऱ्यावर कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी केली. दीपाली चव्हाण यांच्या आत्म्यास शांती लाभावी आणि पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी रेड्डीला कडक शिक्षा झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे प्रतिपादन यावेळी खासदार नवनीत राणा यांनी केले.
खासदार नवनीत राणा यांना या प्रकरणावर बोलताना अश्रु अनावर झाले होते. दीपाली चव्हाण यांना मदत करु शकले नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती. मी दीपालीला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रेड्डी आणि शिवकुमार हे दोन्ही अधिकारी दोषी असून दोघांवर कारवाई व्हायला हवी, असं त्यांनी म्हटलं होतं.
वनपरिक्षेत्र महिला अधिकाऱ्यांनी संताप
काल या संदर्भात बोलताना वनपरिक्षेत्र महिला अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. दीपाली चव्हाण या खूप खंबीर होत्या हिमतीच्या मात्र त्यांना खूप त्रास दिला गेला. शिवकुमार यांना सेवेतून बडतर्फ करावं. रेड्डी साहेब देखील याला जबाबदार आहेत. त्यांनी दीपाली यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. शासनाला विनंती आहे की, शिवकुमारला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी वनपरिक्षेत्र महिला अधिकाऱ्यांनी यावेळी केली.
लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या दीपाली चव्हाण आणि डीएफओ विनोद शिवकुमार यांच्यामध्ये फोन वरून जो वार्तालाप झाला त्याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये शिवकुमार आपल्याच वनविभागाच्या महिला अधिकाऱ्यांसोबत कसे एकेरी भाषेत बोलतात ते स्पष्ट होत आहे. शिवाय या क्लिपमध्ये शिवकुमार हे बोलताना मान मर्यादा आणि महिलांशी कसं बोलायचं याचं सुद्धा भान नाही. आपली ज्यूनियर अधिकारी आहे म्हणून कसेही बोलायचं पातळी सोडून बोलायचं आणि यामध्ये दीपाली चव्हाण या महिला अधिकाऱ्यांनी जे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे, त्याचं संपूर्ण संभाषण या ऑडिओ क्लिप मध्ये आहे. शिवाय या क्लिपमध्ये दोघांच्या संवादात खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा यांचा देखील उल्लेख आहे. संपूर्ण कॉलमध्ये दीपाली चव्हाण या अत्यंत नम्र भाषेत बोलताना दिसत आहेत तर शिवकुमार मात्र अत्यंत उर्मट भाषेत बोलत आहेत.
दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये शिवकुमार यांच्यावर आरोपदीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार हे गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हेच असतील, त्यांच्यावर कारवाई करा असं लिहिलं आहे. माझ्यासोबत जे झाले ते इतरांसोबत होऊ नये असे आत्महत्या केलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्त्येपूर्वी केलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहलं आहे. वनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे दिपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. ही सुसाईड नोट अर्थात चव्हाण यांनी अपर प्र.भु.व. संरक्षक क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांच्या नावे केला आहे. दीपाली चव्हाण यांनी लिहलेल्या चार पानांच्या या पत्रात त्यांनी आपण का आत्महत्या करत आहोत याबाबत सविस्तर लिहून दिलं आहे.

