मोठी बातमी ! मुंबई पोलीस दलात मोठे बदल, गुन्हे शाखेच्या तब्बल 65 अधिकाऱ्यांच्या बदल्या

0 झुंजार झेप न्युज

मुंबई गुन्हे शाखेच्या एकूण 65 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरण, उद्योजक मनसुख हिरे मृत्यू, सचिन वाझे या प्रकरणांमुळे राज्य सरकार चांगलेच अडचणीत सापडलेले आहे. त्यानंतर आज पोलिसांच्या बदल्यांसाठी रॅकेट सुरु असल्याचे आरोप भाजपने केले. हे सर्व संकटं समोर असताना मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या एकूण 65 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुकेश अंबानी धमकी प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी एपीआय रियजुद्दीन काझी आणि एपीआय प्रकाश होवाळ यांचीसुद्धा बदली करण्यात आलीये.

सर्व युनीट प्रमुखांच्या बदल्या

पोलिसांच्या बदल्यांसाठी राज्यात मोठे रॅकेट सुरु असल्याचा अहवाल दाबल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. संपूर्ण राज्यातून महाविकास आघाडी सरकारवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे शाखेत तब्बल 65 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजेच मुंबईतील सर्व युनीट प्रमुखांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. सीआययू युनिटचे एपीआय रियजुद्दीन काझी यांना सशस्त्र पोलीस दलात पाठवण्यात आलंय. तर सीआययू युनिटचे एपीआय प्रकाश होवाळ यांची बदली मलबार हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी मुकेश अंबानी धमकी प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत.

मागील काही दिवसांपासून सरकारवर अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू, सचिन वाझे खंडणी, मुकेश अंबानी धमकी आणि आता पोलिसांच्या बदल्यांसाठी रॅकेट अशा अनेक प्रकारचे संकटं राज्य सरकारसमोर उभे टाकले आहे. विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका होत आहे. 15 वर्षांपासून निलंबित असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पोलीस दलात परत घेतलं जातं. याच पोलिसावर खंडणीचे आरोप होतात, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस दलावरील विश्वास उडाल्याचं म्हटलंय. तसेच, पोलीस दल तसेच राज्य सरकारने चिंतन करण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलात हे मोठे बदल करण्यात आले आहेत.

देवेंद्र फडणवीसांकडे कोणतीह स्फोटक माहिती

गुप्तचर विभागाच्या आयुक्तांना पोलीस दलात बदल्यांसाठी रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यासाठी थेट अधिकाऱ्यांशी बोलणी सुरु होती. ही बाब गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालकांना ही माहिती दिली.

पोलीस महासंचालकांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला विनंती करून या सर्व लोकांच्या कॉल इंटरसेप्शनची परवानगी मागितली. ही परवानगी मिळाल्यानंतर कॉल रेकॉर्डिंगमध्ये स्फोटक माहिती समोर आली. बदल्यांच्या रॅकेटमध्ये अनेक मोठे अधिकारी आणि राजकीय लोकांची नावं समोर आली.

रश्मी शुक्ला यांनी 25 ऑगस्ट 2020 रोजी ही माहिती पोलीस महासंचालकांना दिली. 26 तारखेला पोलीस महासंचालकांनी ही माहिती तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवली. या सगळ्या प्रकाराची सीआयडीकडून चौकशी होणे गरजेचे आहे, असे पोलीस महासंचालकांनी आपल्या अहवालात म्हटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याविषयी समजल्यानंतर त्यांनीही चिंता व्यक्त केली. मात्र, यावर कारवाई करण्याऐवजी हा अहवाल त्यांनी गृहमंत्रालयाकडे पाठवला. ही माहिती बघितल्यानंतर गृहमंत्रालयाने कारवाई करणे सोडाच पण गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्तांनाच शिक्षा केली. त्यांना अपेक्षित बढती मिळाली नाही. त्यानंतर गुप्तचर विभागाच्या डेटामध्ये नमूद केल्याप्रमाणेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.