गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची शहानिशा केली, तपशीलात जाऊन तपासणी होत आहे, अशी माहिती जयंत पाटलांनी दिली.
सांगली : महिन्यातून दोन तीन वेळा विरोधी पक्ष राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत असतो. यात नवीन काही नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. मंत्रिमंडळात कोणत्याही फेरबदलाची आवश्यकता नाही, असंही जयंत पाटलांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रपती राजवटीच्या मागणीत नवीन काय?
राज्यात काहीही झालं तरी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होते. महिन्यातून दोन तीन वेळा विरोधी पक्ष ही मागणी करतो. यात नवीन काही नाही, असं जयंत पाटील म्हणाले. नुकतीच भाजपसह खासदार नवनीत राणा, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
“पवारांनी भूमिका बदलली नाही”
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका बदलली, हा आरोप चुकीचा आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची शहानिशा केली, तपशीलात जाऊन तपासणी होत आहे, अशी माहिती जयंत पाटलांनी दिली.
विरोधकांनी आरोप केल्यावर आम्ही गांभीर्याने घेतो, पण त्यांनी मागणी केली म्हणून कारवाई करावी असं होत नाही. मंत्रिमंडळात कोणत्याही बदलाची आवश्यकता नाही, हे आम्ही याआधीही स्पष्ट केलंय, असं जयंत पाटलांनी सांगितलं.
अनिल देशमुखांचे गृह खाते काढण्याची चर्चा
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. भाजप नेत्यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तर शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इकोनॉमिक्स टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.

