जळगाव जिल्ह्यात सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे 4 हजार 534.30 हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे.
जळगाव : जिल्ह्यात सोमवारी (22 मार्च) झालेल्या अवकाळी पावसामुळे विविध तालुक्यातील 4 हजार 534.30 हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक एक हजार 906 हेक्टरवर जळगाव तालुक्यात नुकसान झाले आहे. पिकांमध्ये मक्याला सर्वाधिक फटका बसला असून 1391.20 हेक्टरवरील मका हातचा गेला आहे.
अवकाळीचा पुन्हा फटका
गेल्या महिन्यात 18 फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी मधून बळीराजा सावरत नाही तोच पुन्हा काल संध्याकाळी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामध्ये जिल्ह्यातील जळगाव, बोदवड, मुक्ताईनगर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या सहा तालुक्यात पिकांना मोठा फटका बसला आहे. याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाच्यावतीने जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान
या अवकाळी पावसामध्ये सर्वाधिक नुकसान जळगाव तालुक्यातील झाले असून 1 हजार 906 हेक्टर वरील पिके नष्ट झाली आहे. त्याखालोखाल चाळीसगाव तालुक्यात 1592.90 हेक्टर वर नुकसान झाले. तसेच पाचोरा तालुक्यात 862.20 हेक्टर, बोदवड तालुक्यात89.40 हेक्टर, मुक्ताईनगर तालुक्यात 46 हेक्टर, भडगाव तालुक्यात 37.80 हेक्टरवर असे एकूण चार हजार 534.30 हेक्टरवर नुकसान झाले आहे. पिकांमध्ये सर्वाधिक फटका मक्याला बसला असून सहा तालुक्यात 1391.20 हेक्टरवरील मका नष्ट झाला आहे. त्याखालोखाल रब्बी ज्वारीचे आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बीडमध्येही अकाळी पावसाची हजेरी
बीड जिल्ह्यात तीन दिवसांपासून अवकाळी पावसाला सुरुवात झालीय. आज पहाटेपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. गेवराई तालुक्यात देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. केकत पांगरी येथील गोविंद खाडे यांच्या शेतातील रब्बीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने उभी असलेली पीके आडवी झाली आहेत. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
बीडमध्ये कुक्कुटपालन करणाऱ्यांना फटका
मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाल्याने याचा फटका कुक्कुट पालन करणाऱ्या व्यावसायिकांना बसला आहे. गेवराईच्या राजापूर येथील शेख इमाम आणि राहुल बेडके यांचं कोंबड्यांचा शेड उध्वस्त झाले. तब्बल 140 गावरान कोंबड्या मृत पावल्या आहेत तर अनेक कोंबड्या जखमी झाले आहेत. गारपिटीने नुकसान झाल्याने शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
बीड, वडवणी आणि माजलगाव तालुक्यात पावसाचा जोर
बीड जिल्ह्यात पहाटेपासून अवकाळी पावसाला सुरुवात झालीय. मेघ गर्जनेसह सर्वदूर पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी गारांचा पाऊस देखील झाला आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. पहाटे पासूनच रिमझिम सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यात आज सूर्यदर्शन झालेच नाही. बीड, वडवणी आणि माजलगाव तालुक्यात पावसाचा जोर मोठा आहे.

