शिवसेनेत आलेल्या सतीश सावंत यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून भाजपचे सात सदस्य त्यांच्या गळाला लागल्याची माहिती आहे.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि सभापती पदांची निवड उद्या, 24 मार्चला होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. खासदार नारायण राणे यांच्या गोटातून शिवसेनेत गेलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत हे राणेंना धक्का देण्यासाठी गेले काही दिवस जोरदार फील्डिंग लावत आहेत.
ज्या पक्षात राणे, त्या पक्षाची सत्ता
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर गेली काही वर्ष खासदार नारायण राणे यांचेच वर्चस्व राहिले आहे. अनेकदा जिल्ह्यातील राणेविरोधी पक्षांनी निवडणुकीत एकत्र येत त्यांच्याकडून जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कधी यशस्वी होऊ शकला नव्हता. नाही. नारायण राणे ज्या-ज्या पक्षात, त्या त्या पक्षाची सत्ता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर राहिली आहे. आताही कधी नव्हे ती पहिल्यांदाच जिल्हा परिषद भाजपकडे आहे, तेही राणेंमुळेच. सध्या एकूण 50 सदस्य असलेल्या या जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे 31, तर शिवसेनेचे 19 सदस्य आहेत.
शिवसेनेला वर्चस्वासाठी सात सदस्यांची गरज
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विषय समिती सभापती यांची उद्या निवड आहे. एकहाती सत्ता असलेल्या भाजपची झोपमोड तूर्तास तरी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेला वर्चस्वासाठी अवघ्या सात सदस्यांची गरज आहे. राणेंच्या गोटातून शिवसेनेकडे गेलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत हे राणेंना धक्का देण्यासाठी गेले काही दिवस जोरदार फील्डिंग लावत आहेत.
नितेश राणेंची तातडीची पावलं
अत्यंत गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतीश सावंत यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून भाजपचे सात सदस्य त्यांच्या गळाला लागले आहेत. अचानक शिवसेनेने घेतलेल्या या पवित्र्याने भाजपला मोठा धक्का बसला असून भाजप नेते नितेश राणे यांनी काल आपल्या जिल्हा परिषद सदस्यांची एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीलाही काही सदस्यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे अध्यक्ष निवडीत दगाफटका होणार, हे निश्चित झाले होते.
तीन सदस्यांची मनधरणी?
भाजपनेही उलटा डाव खेळत शिवसेनेच्या काही सदस्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नसल्याची माहिती आहे. सुत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेच्या गळाला लागलेल्या सात सदस्यांपैकी तीन सदस्यांची मनधरणी करण्यात नितेश राणेंना यश आलं आहे. मात्र अध्यक्ष पदासाठी कोण उमेदवार असणार यावरच सगळं अवलंबून आहे.
सिंधुदुर्गात सध्या दोन्ही पक्षांकडून बैठकांचा मोठा सिलसिला सुरु असून भाजपने आपल्या काही सदस्यांना नजरकैदेत ठेवल्याचेही वृत्त आहे. स्पष्ट बहुमत असूनही जर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिवसेनेकडे गेली, तर राणेंसह भाजपला हा मोठा धक्का मानावा लागेल. तसं घडल्यास याचे परिणाम आणि पडसाद भविष्यात जिल्ह्याच्या राजकारणात नक्की पाहायला मिळतील.

