राजू पाटील यांनी संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे.
कल्याण-डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. राजू पाटील यांनी संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे.
गेले वर्षभर कोरोनासोबत लपंडाव खेळत होतो, पण तुर्तास कोरोनाच्या तावडीत सापडलोच ! गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, आवश्यक वाटल्यास चाचणी करावी. कोरोना बरा होतो. लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा जोमाने कामाला लागेन, असे ट्वीट राजू पाटील यांनी केले आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राजू पाटील हे सातत्याने फ्रंटलाईनवर काम करत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राजू पाटील यांनी सरकारकडे अनेक मागण्या केल्या होत्या. कल्याण-डोंबिवलीच्या हद्दीत कोरोना चाचणी केंद्रांची संख्या वाढवली. तसेच लसीकरणाचे केंद्र वाढविणे जास्त गरजेचे आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त कोरोना रूग्ण कल्याण-डोंबिवलीमध्ये सापडत आहेत. सर्व खापर लोकांवर फोडून नाही चालणार, प्रशासन पण सपशेल फेल ठरत आहे, अशी टीका राजू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महाविकासआघाडी सरकारवर केली होती.
राज्यात 35 हजार 952 नवे कोरोना रुग्ण
राज्यात काल (25 मार्च) 35 हजार 952 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. काल नवीन 20 हजार 444 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर दिवसभरात 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण 2 लाख 62 हजार 685 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.78% झाले आहे. आतापर्यंत एकूण 22 लाख 83 हजार 037 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या 13 लाख 62 हजार 899 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 13 हजार 770 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
ठाण्यातील कोरोना स्थिती –
ठाण्यात काल दिवसभरात 932 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 304 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ठाण्यात आतापर्यंत 71 हजार 942 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील 64 हजार 441 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 1 हजार 374 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

