मनसे नेते अविनाश जाधव यांना अटक, मलंगगडावर आरती करण्यापूर्वीच बेड्या

0 झुंजार झेप न्युज

जमावबंदी आदेश लागू असताना गर्दी केल्याचा ठपका अविनाश जाधवांवर ठेवण्यात आला आहे. 

उल्हासनगर : मनसेचे पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना अटक करण्यात आली आहे. जमावबंदी आदेश लागू असताना गर्दी केल्याचा ठपका जाधवांवर ठेवण्यात आला आहे. अविनाश जाधवांसह काही कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.

अविनाश जाधव हे मलंगगडावर आरती करण्यासाठी जाणार होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी त्यांना काकडवाल गावाजवळ अडवलं आणि नेवाळी पोलीस चौकीत आणलं. यावेळी अविनाश जाधव यांच्यासोबत मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

हिललाईन पोलिसांची कारवाई

उल्हासनगर परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांनी जाधव यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अविनाश जाधव यांना नेवाळी पोलीस ठाण्यातून उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. अखेर हिललाईन पोलिसांनी अविनाश जाधव यांना अटक केली.

नर्स आंदोलनावेळीही अटक

अविनाश जाधव यांना अटक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ठाणे न्यायालयाने अविनाश जाधव यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलीस कोठडी सुनावली होती. महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्या प्रकरणी मनसे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करत असताना जुलै 2020 मध्ये पोलिसांनी अटक केली होती.

“मला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तरीही शेवटी सत्याचा विजय झाला. असे कितीही खोटे गुन्हे दाखल झाले तरी आम्ही त्याला घाबरणार नाहीत. तुमचं पितळ एका दिवशी उघडं करणार”, असा इशारा अविनाश जाधव यांनी जामीन मिळाल्यानंतर दिला होता.

नेमकं प्रकरण काय?

नर्सेस आंदोलन प्रकरणी ठाण्याच्या कापुरबावडी पोलिसांनी जाधव यांना अटक केली होती. वसई पालिका आयुक्त दालन आंदोलन प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांना आधी तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ठाण्याच्या खंडणीविरोधी विभागाने जाधव यांना 31 जुलै 2020 रोजी अटक केली होती. ठाणे दिवाणी न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता, मात्र ठाणे सत्र न्यायालयाने सात दिवसानंतर जामीन मंजूर केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.