कर्जत पंचायत समिती सभापती निवडीत रोहित पवारांचं वर्चस्व, राष्ट्रवादीच्या मनिषा जाधव बिनविरोध

0 झुंजार झेप न्युज

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या मनिषा जाधव यांची वर्णी लागली.

अहमदनगर : अहमदनगरला कर्जत पंचायत समितीच्या सभापती पदासाठी बिनविरोध निवडणूक झाली. कर्जत जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांचं निवडणुकीत वर्चस्व पाहायला मिळालं. त्यामुळेच राष्ट्रवादीने निर्विवाद झेंडा फडकवत यश मिळवलं.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत पंचायत समितीच्या सभापती पदासाठी बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीच्या मनिषा जाधव यांची सभापतीपदी वर्णी लागली आहे. या निवडीच्या वेळी भाजपचे दोन सदस्य अनुपस्थित होते. तर शिवसेनेचा एकमेव सदस्य प्रशांत बुद्धीमत महाविकास आघाडीत सामील झाला. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी सोपी झाली.

कार्यकर्त्यांचा होळीआधीच गुलाल

पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडीनंतर मनिषा जाधव यांचा सत्कार करण्यात आला. तर कार्यकर्त्यांनी होळीआधाीच गुलालाची उधळण करुन जल्लोष साजरा केलाय.

रोहित पवारांचा गेल्या वर्षीही भाजपला दणका

गेल्या वर्षीही अहमदनगरमध्ये भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दणका दिला होता. कर्जत पंचायत समितीमधील भाजपची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली. आठ सदस्य असलेल्या कर्जत पंचायत समितीमध्ये सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या अश्विनी काणगुडे यांचा विजय झाला होता.

नेमकं काय झालं होतं?

कर्जत पंचायत समितीमध्ये त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे चार सदस्य होते. मात्र त्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या साधना कदम भाजपमध्ये जाऊन सभापती झाल्या होत्या. परंतु साधना कदम गेल्या वर्षी कर्जत पंचायत समितीमध्ये सभापतीपदाच्या निवडणुकीला उपस्थित राहिल्या नव्हत्या. 

पर्यायाने भाजपचे दोन आणि शिवसेनेचा एक, असे तीनच सदस्य भाजपकडे राहिले होते. भाजपकडे पुरेसं संख्याबळ नसल्याने त्यांनी सभापतीपदाचा अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांच्या पाठबळावर अपक्ष असलेल्या अश्विनी कदम यांची बिनविरोध निवड झाली होती.

विधानसभेला रोहित पवारांकडून राम शिंदेंचा पराभव

अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. टीका टिपण्णी आणि आरोप प्रत्यारोपांनी गाजलेली कर्जत जामखेडची निवडणूक गाजली होती. रोहित पवार यांना कर्जत जामखेड मतदारसंघातून 1 लाख 34 हजार 848 मतं मिळाली. तर राम शिंदे यांना 91 हजार 815 मते मिळाली. रोहित पवार यांनी राम शिंदेंना 43 हजार 947 मताधिक्यांनी पराभूत केले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.