उत्तर प्रदेशच्या देवरिया येथे भयानक घटना समोर आली आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या देवरिया येथे एक महिन्यांआधी शेतात एका 17 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला होता. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली होती. मृतक मुलीचं कुणाशीही वैर नव्हतं. याशिवाय तिचे कुणाहीसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा नव्हती. मग तरीही तिची हत्या का करण्यात आली? असा सवाल गावकऱ्यांसह पोलिसांना पडला. मात्र, सलग एक महिन्याच्या तपासानंतर पोलिसांना जी माहिती मिळाली त्याने पोलीस देखील हैराण झाले.
मृतक मुलीचं नाव खुशी असं होतं. खुशीच्या भावाचं गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधाबाबत संपूर्ण गावभर चर्चा होती. याबाबत खुशीच्या भावाच्या प्रेयसीच्या भावाला माहिती मिळाली. तेव्हा त्याने संतापून बहिणीच्या प्रियकराचा काटा काढण्यासाठी खुशीची हत्या करण्याचा कट रचला. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने खुशीची हत्या केली.
नेमकं प्रकरण काय?
विशाल चव्हाण नावाच्या युवकाचं सुनील चव्हाण या तरुणाच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधाबाबत गावभर चर्चा होती. सुनील चव्हाण हा गावात राहत नव्हता. तो गुजरातमध्ये नोकरी करतो. मात्र, काही कामानिमित्ताने तो गावी आला. गावी आल्यानंतर गावात त्याच्या बहिणीच्या प्रेमसंबंधाबबत चर्चा सुरु असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याच्या आतमधील विकृत राक्षस जागी झाला.
चारा घेण्यासाठी गेलल्या खुशीला वाटेत गाठत हत्या
सुनीलने आपल्या बहिणीचा प्रियकर असलेल्या विशालचा काटा काढण्याचं ठरवलं. विशालची बहीण खुशी ही 17 फेब्रुवारीला शेतात चारा आणण्यासाठी जात होती. त्यावेळी सुनीलने आपला मित्र परमसिंहसोबत मिळून खुशीची गळा चिरुन हत्या केली. या घटनेनंतर 23 फेब्रुवारीला एका महिलेला गव्हाच्या शेतात खुशीचा मृतदेह दिसला. त्यानंतर गावात एकट खळबळ उडाली.
पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले?
गावकऱ्यांनी पोलिसांना तातडीने या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस या प्रकरणाचा जवळपास महिन्याभरापासून तपास करत होते. मात्र, त्यांना काहीत सुगावा मिळत नव्हता. अखेर गावातील एका व्यक्तीकडून त्यांना या घटनेबाबत सुगावा लागला. त्याच माहितीच्या आधारावर त्यांनी दोघांना अटक केली. आरोपींनी पोलिसांकडे आपला गुन्हा कबूल केला. या घटनेप्रकरणी पोलिसांचा अद्यापही तपास सुरुच आहे. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत

