रश्मी शुक्ला प्रकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बुमरँग झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.
नाशिक: रश्मी शुक्ला प्रकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बुमरँग झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. सत्ताधाऱ्यांचा हा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी फेटाळून लावला आहे. फडणवीस नव्हे तर आघाडी सरकामधील नेतेच अस्वस्थ झाल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केल आहे.
नाशिक येथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्याची पाहणी करण्यासाठी प्रवीण दरेकर आज शेतकऱ्यांच्या बांधावर आले होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. देवेंद्र फडणवीसांना अस्वस्थ होण्याची काहीच आवश्यकता नाही. फडणवीसांनी सरकारवर केलेला घणाघात, त्यांनी सरकारचे काढलेले गैरव्यवहार आणि घोटाळे बाहेर काढल्याने सरकाच अस्वस्थ झालं आहे. त्यामुळेच फडणवीस अस्वस्थ झाल्याचा कांगावा केला जात आहे, असं दरेकर यांनी सांगितलं.
पोलीस खात्याची बदनामी कोण करतंय?
आज महाराष्ट्रातील जनतेचा सरकारवर विश्वास नाही हे दाखवून देण्याचं काम फडणवीस करत आहेत. त्यामुळे त्यांना अस्वस्थ होण्याचा प्रश्न येतोच कुठे? उलट नवाब मलिक यांच्यासह सर्वजण अस्वस्थ आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे. महाराष्ट्र पोलीस हे मलिक किंवा सरकार यांचे नाही. महाराष्ट्र पोलीस सर्वांचेच आहे. पोलिसांची बदनामी होऊ नये हे आम्हाला ही वाटतंय. परंतु पोलीस खात्यात बदनाम लोक आहेत. त्यांना संरक्षण दिलं जात आहे. पोलीस दलात वाझे सारख्यांना प्रमोशन दिलं जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
अहवाल बाहेर आलाच कसा?
रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या अहवालाची दोन पानेच फडणवीसांनी दाखवली होती. पण हा संपूर्ण अहवाल मलिक यांनी लिक केला. एका दिवसात हा गुप्त अहवाल बाहेर आलाच कसा? मीडियाच्या हाती हा अहवाल लागलाच कसा? असा सवाल करतानाच दुसऱ्यांकडे दोन बोटं दाखवताना चार बोटं आपल्याकडे आहेत याचं भान सरकारला नाही हे दुर्देव आहे, असंही ते म्हणाले.

