उद्धव ठाकरेंना कणा नाही, राज्यात नवीन सरकार आलं पाहिजे: प्रकाश आंबेडकर

0 झुंजार झेप न्युज

सध्याच्या घडीला आठ यंत्रणा माझा फोन टॅप करत आहेत.

पुणे: महाविकासआघाडी सरकारमध्ये गुन्हेगारी वृत्ती आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त करून राज्यात नवं सरकार आलं पाहिजे, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर  यांनी केले. उद्धव ठाकरे हे गेल्या पाच वर्षांमध्येही सत्तेत होते. या गोष्टी त्यांना माहिती नाहीत, असे नव्हे. पण उद्धव ठाकरे यांना कणा नाही. त्यांना कठोर निर्णय घेता येत नाहीत, अशी खरमरीत टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ते रविवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते पश्चिम बंगालची निवडणूक अशा विषयांवर चौफेर फटकेबाजी केली. सरकारमधील मंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना पैसे गोळा करायला सांगितले होते, ही सत्य परिस्थिती आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा आदेश देण्यात आला होता का? मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली होती का, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात सध्या गाजत असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणावरही भाष्य केले. सध्याच्या घडीला आठ यंत्रणा माझा फोन टॅप करत आहेत. मी सरळ सरळ हा आरोप करत आहे. मात्र, मी कुणाकडे पैसे मागत नाही. त्यामुळे मला कसलीही भीती वाटत नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

‘मोदी बंगालमध्ये जितका प्रचार करतील तितका फायदा ममता बॅनर्जींना मिळेल’

पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात नियमांचे उल्लंघन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:च आदेशांची पायमल्ली करत आहेत. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल केलेला नाही. माझं पोलिसांना आव्हान आहे की, त्यांनी मोदींवर गुन्हा दाखल करुन दाखवावा.

तसेच नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये जितका प्रचार करतील तेवढा फायदा ममता बॅनर्जी यांना होईल.

बंगालच्या लोकांना कोणीही डिवचलेले आवडत नाही. परंतु, मोदी वारंवार त्यांना बंगालमध्ये जाऊन डिवचत आहेत. त्यामुळे मोदी जितक्या वेळा बंगालमध्ये सभा घेतील ममता बॅनर्जींच्या जागांमध्ये तितकी भर पडेल, असे भाकीत प्रकाश आंबेडकर यांनी वर्तविले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.