जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करुन काल इम्तियाज जलील यांनी जल्लोष साजरा केला होता.
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कोरोना पसरण्याला एमआयएम खासदार इम्तियाज जलील जबाबदार आहेत, अशा शब्दात शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आगपाखड केली. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करुन काल इम्तियाज जलील यांनी जल्लोष साजरा केला होता. त्यानंतर खैरेंनी जलील यांच्या अटकेची मागणी केली आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही जलील यांच्यावर सडकून टीका केली.
इम्तियाज जलील यांच्या अटकेची मागणी
“औरंगाबाद शहरातील कोरोनाला इम्तियाज जलील जबाबदार आहेत. इम्तियाज जलील यांच्यावर तातडीने कारवाई करा. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा” अशी मागणी चंद्रकांत खैरेंनी केली. इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करु, असा इशाराही त्यांनी दिला.
“नाचताना शरम वाटायला पाहिजे”
“MIM च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? संभाजीनगरमघ्ये लॉकडाऊन स्थगित झाला म्हणून इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षाने मोठा जल्लोष केला. संभाजीनगरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे, परिस्थिती गंभीर असताना जल्लोष करुन नाचताना शरम वाटायला पाहिजे” असं मनसे नेते अमेय खोपकरांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
“हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. हे असे ‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत. कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या असल्या स्टंटबाज नेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे” अशी मागणीही अमेय खोपकर यांनी केली आहे.
नेमकं काय घडलं?
औरंगाबादमधील लॉकडाऊनचा निर्णय रद्द होताच इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांच्या ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली होती.
इम्तियाज जलील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना कोरोनाचा विसर पडला होता. एकीकडे औरंगाबाद शहरात कोरोनाची रुग्णसंख्या हजारांच्या घरात गेली असताना आणि मृतांचा आकडा थेट चाळीसवर पोहोचला असताना, खुद्द खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या समर्थकांनी केलेला जल्लोष धोकादायक समजला जात आहे.

