अजित पवारांचा पंढरपूर दौरा, कोरोना नियमांचे तीन तेरा! राष्ट्रवादीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

0 झुंजार झेप न्युज

पंढरपूर पोटनिवडणुकीचा राष्ट्रवादी उमेदवार ठरवण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला कोरोनाचे नियम डावलून शेकडोंनी गर्दी जमा झाली होती. अखेर कोरोना नियमांचे पालन न झाल्याने या कार्यक्रमाचे आयोजकांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पंढरपूर : पंढरपूर पोटनिवडणुकीचा राष्ट्रवादी उमेदवार ठरवण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या श्रीयश पॅलेस येथे झालेल्या कार्यक्रमाला कोरोनाचे नियम डावलून शेकडोंनी गर्दी जमा झाली होती. अखेर कोरोना नियमांचे पालन न झाल्याने या कार्यक्रमाचे आयोजकांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक अजित पवार यांनी पहिल्या टप्प्यात पंढरपूर व मंगळवेढा या भागातील विविध शिष्टमंडळाची भेट घेताना प्रत्येक शिष्टमंडळात 20 सदस्य बंधनकारक केले होते. 

मात्र कार्यालयाबाहेर खूप मोठ्या संख्येने जमा झालेले राष्ट्रवादी समर्थक या कार्यालयात घुसल्यानंतर येथे हे सभा झाली. ज्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अजित पवार यांनी या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मात्र हे होत असताना कोरोनाचे सर्व नियम डावलण्यात आल्याने निवडणुकीसाठी नेमलेल्या छायाचित्रीकरण पथक प्रमुख मिघाराज कोरे यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप मांडावे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे डीवायएसपी विक्रम कदम यांनी सांगितले. ही पोटनिवडणूक 13 एप्रिल रोजी होत असून 23 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होत आहे. 

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून चौघे इच्छुकपंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून चार उमेदवार इच्छुक असल्याची माहिती सोलापूर जिल्हा बूथ अभियान प्रमुख बाळाभाऊ भेगडे यांनी दिली. विधान परिषदेचे विद्यमान आमदार प्रशांत परिचारक, उद्योजक समाधान अवताडे , उद्योजक अभिजित पाटील आणि स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य बब्रुवान रोंगे हे चौघे भाजपकडून पोटनिवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची माहिती भेगडे यांनी दिली. याबाबत आता भाजपाची प्रदेश पार्लमेंटरी बोर्ड या उमेदवाराची यादी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे उमेदवार यादी पाठवणार असल्याचे बाळा भेगडे यांनी सांगितले. भेगडे व सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी इच्छुक उमेदवारांबाबत माध्यमांना माहिती देताना या चौघातील एक उमेदवार येत्या चार दिवसात जाहीर होईल असे सांगितले.  

राष्ट्रवादीकडून भालकेंच्या पत्नी किंवा मुलाला उमेदवारी

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके अथवा पुत्र भगीरथ भालके यांच्यापैकी एक नाव निश्चित केले जाणार असल्याची शक्यता आहे. भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडून एका गटाने भालके परिवारात उमेदवारी देण्यास विरोध केल्याने अजित पवार यांना पंढरपूरला यावे लागले. सध्या राष्ट्रवादीकडे उमेदवार मागणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी दिवंगत आमदार भारत भालके यांच्याबाबत गोरगरीब मतदारांत असलेली सहानुभूतीचा विचार करता राष्ट्रवादीकडून भालके यांच्या परिवारातच उमेदवारी देण्याची मानसिकता दिसत आहे. त्यानुसार पक्षाकडून भालके यांच्या पत्नी जयश्रीताई यांचे नाव नक्की करण्याची तयारी सुरु असताना भालके समर्थकांना मात्र त्याजागी भालके यांचे पुत्र भगीरथ भालके याना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा आहे. भालके यांच्या पत्नी राजकारणापासून कायमच दूर राहत त्यांनी कुटुंबाकडे आजवर जास्त लक्ष दिले होते. अशावेळी त्यांना उमेदवारी दिल्यास पराभवाची भीती भालके समर्थकांना वाटते. याउलट भगीरथ भालके यांची नुकतीच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदावर निवड झाल्यापासून त्यांनी मंगळवेढा व पंढरपूर या दोन्ही तालुक्यात गावभेटी करून वातावरण तयार केले आहे. मतदारसंघाचा पहिला दौराही त्यांचा आत्तापर्यंत पूर्ण झाल्याने भगीरथ यांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादीला चांगला विजय मिळेल अशी भालके समर्थकांची भूमिका आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.