लॉकडाऊनच्या भीतीमुळे परराज्यातील कामगारांची गावी परतण्यासाठी घाई

0 झुंजार झेप न्युज

लॉकडाऊन करायचा झाल्यास सरकारने आम्हाला किमान दोन-तीन दिवस अगोदर सूचना द्यावी.

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे ठाकरे सरकार महाराष्ट्रात लॉकडाऊन  करण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास गेल्यावर्षीसारखी वाईट परिस्थिती ओढावू शकते या भीतीने आता महाराष्ट्रात वास्तव्याला असणाऱ्या परराज्यातील कामगारांनी गावी परतण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

देशभरातून अनेक मजूर रोजीरोटीसाठी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये वास्तव्य करुन आहेत. यापैकी बहुतांश जण असंघटित क्षेत्र किंवा रोजंदारीवर काम करणारे आहेत. लॉकडाऊन झाल्यास सगळे दैनंदिन व्यवहार ठप्प होतील. त्यामुळे या कामगारांची उपासमार होऊ शकते. परिणामी हे सर्व मजूर आणि कामगार सध्या प्रसारमाध्यमांमधील प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवून आहेत.

ठाकरे सरकारने अद्याप लॉकडाऊनचा ठोस निर्णय घेतलेला नाही. मात्र, आम्हाला गेल्यावेळीप्रमाणे पुन्हा स्वत:ची फरफट होऊन द्यायची नाही, असे परराज्यातील कामगारांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्या आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी हातावर पोट असलेल्या मजुरांनी हजारो मैल दूर असणाऱ्या आपल्या गावी पायी चालत जाण्याचा मार्ग पत्करला होता. यामध्ये अनेक मजुरांचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनचे ढग दाटू लागल्याने हे कामगार सावध झाले आहेत.

लॉकडाऊन करायचा झाल्यास सरकारने आम्हाला किमान दोन-तीन दिवस अगोदर सूचना द्यावी. जेणेकरून आम्ही येथे अडकून पडण्यापेक्षा आमच्या गावी जाऊ, असे अनेक कामगारांचे म्हणणे आहे.

लॉकडाऊनच्या चर्चेमागे लेबर कॉन्ट्रॅक्टर?

राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा तापवण्यामागे लेबर कॉन्ट्रॅक्टर्सच्या लॉबीचा हात असल्याचे म्हटले जाते. जेणेकरून अनिश्चितता वाढल्यास लेबर रेट आणि कंत्राटांची मुदत वाढवता येईल. मात्र, या सगळ्यामुळे राज्यातील कारखानदार धास्तावले आहे. राज्याला दुसरा लॉकडाऊन परवडणार नाही, असे मत उद्योगविश्वातून व्यक्त केले जात आहे.

छोट्या कंपन्यांमधील कामगार गावी परतायला सुरुवात

फेब्रुवारी महिन्यापासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात दिवसाला कोरोनाचे 30 हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. ही परिस्थिती कायम राहिल्यास महाराष्ट्रात लॉकडाऊन अटळ असेल. त्यामुळे अनेक लहान कंपन्यांमधील कामगारांनी गावी परतायला सुरुवात केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.