काही पोलीस कर्मचारी नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करताना आपल्या अधिकाराचा गैरवापर करताना दिसत आहेत.
भोपाळ : देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना मास्क, सॅनेटायझर आणि सोशल डिस्टन्स ठेवण्याचं आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केलं जात आहे. मात्र, तरीही अनेकजण प्रशासनाच्या आवाहनाला गांभीर्याने घेताना दिसत नाही. अनेकजण अजूनही मास्क वापरत नाहीत. त्यामुळे पोलीसही आता कडक पवित्रा घेताना दिसत आहेत. मात्र, काही पोलीस कर्मचारी नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करताना आपल्या अधिकाराचा गैरवापर करताना दिसत आहेत. या संबंधात मध्य प्रदेशच्या इंदूर शहराताली एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत पोलीस एका व्यक्तीला निर्दयीपणे मारहाण करताना दिसत आहेत.
व्हिडीओत नेमकं काय?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दोन पोलीस कर्मचारी एका चौकात मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करताना दिसत आहेत. यावेळी एक व्यक्ती त्यांना मास्क न घातलेला आढळला. त्यांनी त्या व्यक्तिला प्रचंड मारहाण केली. यावेळी त्या व्यक्तीसोबत त्याचा लहान मुलगाही होता. त्याचा लहान मुलगा पोलिसांना विनवणी करत आहे. आपल्या वडिलांना सोडून द्या, अशी वारंवार विनंती करत आहे. पण पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. ते त्याच्या वडिलांना निर्दयीपणे मारत राहिले. त्यानंतर संबंधित व्यक्तीचे काही नातेवाईक तिथे येतात. पोलिसांना विनंती करतात. मात्र, पोलीस त्यांचही ऐकत नाहीत.
पोलिसांना शिवीगाळ
यावेळी मार खाणारा व्यक्ती पोलीस कर्मचाऱ्यांना सुरुवातीला विनंती करत होता. त्यानंतर तोही वेदना असह्य झाल्याने पोलिसांना शिवीगाळ करु लागला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह
संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी पोलीस प्रशासनाच्या कामांवर प्रश्न उपस्थित केले. याप्रकरणी लोकांचा वाढता दबाव पाहता व्हिडीओतील दोनही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. पोलीस अधीक्षक आशुतोष बागरी यांनी याबाबत माहिती दिली.
पोलिसांची नेमकी भूमिका काय?
दरम्यान, सोशल मीडियावर अर्धवट व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. संबंधित व्यक्तीने आधी पोलिसांसोबत मास्क न घालण्यावरुन हुज्जत घातली. त्यानंतर शिवीगाळ केली. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली, असा दावा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणाचा तपास करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

