वीर धरणावर पर्यटनासाठी आलेल्या प्रेमी युगुलासंह पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश शिरवळ पोलिसांनी केला आहे.
सातारा: सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या नीरा नदीच्या किनारी आणि वीर धरणावर पर्यटनासाठी आलेल्या प्रेमी युगुलासंह पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश शिरवळ पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी 6 आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून 1 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पर्यटकांना लुटणारी आंतरजिल्हा टोळी
सातारा जिल्हयात वीर धरण परिसरामध्ये प्रेमी युगुलांसह सुट्टीमध्ये पर्यटनासाठी नीरा नदीच्या किनारी फिरायला आलेल्या नागरिकांना लुटण्याच्या घटना घडत होत्या. कुकरी आणि चाकूसारख्या घातक शस्त्रांचा धाक पर्यटकांना दाखवून लुटमार सुरु होती. हे गुन्हे करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील सहाजणांना शिरवळ पोलिसांनी चितथरारक पाठलाग करून पकडले.
पोलिसांची गस्त आणि टोळीचा भांडाफोड
लुटमारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वीर धरण परिसरात शिरवळ पोलिसांच्याकडून गस्त घालण्याचे काम सुरु होते. पोलिसांना संशयितरित्या दुचाकीवर फिरणारे युवक आढळले. पोलिसानी त्या युवकांना हटकले असता संबंधितानी तेथून पळ काढला. यावेळी शिरवळ पोलिसांनी पळून जात असलेल्या दुचाकीचा पाठलाग करत सराईत गुन्हेगारांना अखेर ताब्यात घेतले. संशयित युवक हे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.त्यांच्याकडुन एकूण सुमारे 1 लाक 56 हजार रुपयांचा मुद्देमाल शिरवळ पोलिसांनी जप्त केला आहे, अशी माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.
सातारा पोलिसांकडून 5 तासात खुनाचा उलगडा
सातारा शहरातील खंडोबाच्या माळावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत मंगळवारी एक मृतदेह आढळल्यानं साताऱ्यात एकच खळबळ उडाली होती. माळावर काही नागरिक गेले असता त्यांना हा मृतदेह आढळून आला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 5 तासांत हा गुन्हा उघडकीस आणला होता. याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच साक्षीदार आणि गोपनीय माहितीद्वारे जळालेला मृतदेह हा रामनगर येथील आकाश राजेंद्र शिवदास (20) वर्षीय तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी मृत व्यक्तीचे कोणाशी वैर किंवा भांडणतंटे आहेत काय, याची माहिती घेत गुन्ह्याचा उलगडा केला.

