नांदेडमध्ये अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी देखील अपुरी पडत असल्याचं चित्र निर्माण झालंय. सोशल मीडियावर श्रद्धांजलीच्या पोस्ट पाहून भीतिदायक वाटतंय.
नांदेड: गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत चाललाय. कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे नांदेड जिल्ह्यात पाचच दिवसांत कोरोनामुळे 123 जणांचा बळी गेलाय. त्यामुळे नांदेडमध्ये अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी देखील अपुरी पडत असल्याचं चित्र निर्माण झालंय. सोशल मीडियावर श्रद्धांजलीच्या पोस्ट पाहून भीतिदायक वाटतंय.
श्रद्धांजलीचे बॅनर पाहून काळजात धस्स होतंय
सध्या शहरातील चौकाचौकात लागलेले श्रद्धांजलीचे बॅनर पाहून काळजात धस्स होतंय. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा यावेळची लाट अधिक जीवघेणी असल्याचे दिसत असल्याने सर्वत्र निराशा पसरलीय. कोरोनाला रोखण्यासाठी नांदेडमध्येही मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्यात. परंतु तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याचं नाव घेत नाहीय.
रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळणं दुरापास्त झालंय
नांदेडमध्ये कोरोनाच्या बाधितांची संख्या मोठ्या संख्येने वाढल्याने रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळणं दुरापास्त झालंय. अनेकांना हॉस्पिटलमध्ये बेडचा शोध घेत वणवण भटकंती करावी लागतेय, त्यात वेळ जात असल्याने रुग्णांची प्रकृती चिंताजनक होतेय. त्यावर मात करण्यासाठी भाजपच्या वतीने कोव्हिड हेल्पलाईन रूम सुरू करण्यात आलीय. भाजपचे व्यापारी आघाडीचे प्रमुख केदार नांदेडकर यांनी यासाठी पुढाकार घेतलाय. कोरोना बाधित रुग्णांना हवी ती मदत या हेल्पलाईनच्या मदतीने करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी मदत होतेय.
5 एप्रिलपासून 15 एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी 11 दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्याचाही निर्णय घेतला होता. नांदेडमध्ये 5 एप्रिलपासून 15 एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलीय. नांदेडचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी ही माहिती दिलीय.

