कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे संसर्गाचं प्रमाण कमी असल्याचं पांडेय यांनी म्हटलं आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना कोरोनाची लागण झाली आहे. आयएएस ऑफिसर आस्तिककुमार पांडेय यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. मात्र त्यामुळे संसर्गाचं प्रमाण कमी असल्याचं पांडेय यांनी म्हटलं आहे. पांडेय हे औरंगाबादच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचे पती आहेत.
“माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या सर्व एचआरसी आणि एलआरसी यांनी क्वारंटाईन होऊन स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी. मी मेल्ट्रॉनमध्ये ब्लड, सीटी आणि इतर चाचण्या केल्या. कोव्हिड प्रतिबंधक लसीकरणामुळे लक्षणं, फुफ्फुस किंवा शरीराला हानी कमी पोहोचली आहे. मी घरातून कार्यरत राहीन” असं ट्वीट आस्तिक कुमार पांडेय यांनी केलं आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यात आचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे औरंगाबादचे महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे आणि पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील या दाम्पत्यावर क्वारंटाईन होण्याची वेळ आली होती.
स्वत:लाच दंड ठोठावणारा जिल्हाधिकारी
आस्तिक कुमार पांडेय यांनी यापूर्वी स्वत:लाच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना, चहा पिण्यासाठी प्लास्टिक कपचा वापर केल्याने त्यांनी स्वत:वरच कारवाई केली होती. बीडमध्ये निवडणुकीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत हा प्रसंग घडला होता.
काही पत्रकारांनी प्लास्टिकच्या कपमध्ये चहा पिण्यास नकार दिला. प्लास्टिकवर बंदी असताना अशा कपांमध्ये चहा का दिला जात आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. पांडेय यांनी सर्व पत्रकारांसमोर स्वत:ला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. एखाद्या जिल्हाधिकाऱ्याने स्वत:ला दंड ठोठावण्याचं हे कदाचित पहिलंच प्रकरण असेल.

