शंभरी पार केलेल्या सासूच्या पार्थिवाला सुनेने मुखाग्नी दिल्याच्या घटनेची पालघरमध्ये चर्चा आहे.
पालघर : वयाची शंभरी पार केलेल्या वृद्धेच्या पार्थिवाला सूनबाईंनी मुखाग्नी दिला. पालघर जिल्ह्यातील दहिसर गावात ही घटना घडली. पती आणि मुलाच्या निधनानंतर सून नीता गोडांबे वृद्ध सासू ताराबाई गोडांबे यांचा सांभाळ करत होत्या.
शंभरी पार केलेल्या सासूच्या पार्थिवाला सुनेने मुखाग्नी दिल्याच्या घटनेची पालघरमध्ये चर्चा आहे. मनोरजवळ असलेल्या दहिसर या गावातील ताराबाई गोडांबे या वयाची शंभरी पार केलेल्या महिलेचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. शासनाने लागू केलेल्या निर्बंधांमुळे ताराबाई यांचे कुटुंबीय त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी हजर राहू शकले नाहीत.
पती-मुलाच्या निधनानंतर सूनेकडून सांभाळ
ताराबाई यांचे पती आणि मुलाचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. ताराबाई यांचा सांभाळ सध्या त्यांच्या सूनबाई नीता गोडांबे करत होत्या. ताराबाई यांनी अखेरचा श्वास घेतल्याने सूनबाईंवरही दुःखाचा डोंगर कोसळला. महाराष्ट्रासह सध्या पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अंत्ययात्रेला ठराविक जणांनाच उपस्थित राहण्याची मुभा आहे. त्यामुळे ताराबाई यांच्या सूनेनेच आपल्या सासूच्या पार्थिवाला अग्नी देऊन अखेरचा निरोप दिला.
बीडमध्ये चार सुनांचा सासूला खांदा
बीड शहरातील काशिनाथ नगर येथे वास्तव्यास असणाऱ्या सुंदरबाई नाईकवाडे यांचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पश्चात चार मुलं आणि दोन मुली आहेत. मात्र सासरी असताना कधीच माहेरची आठवण येऊ न दिल्याने या सुनांनी आपल्या लाडक्या सासूला खांदा देऊन अखेरचा निरोप दिला होता.
सांगलीत वृद्धेवर सामाजिक कार्यकर्त्यांकडून अंत्यसंस्कार
वृद्ध मातेच्या अंत्यसंस्काराकडे पोटच्या मुलांनी पाठ फिरवली, मात्र सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ही मन हेलावणारी घटना घडली. मुलांच्या कृतघ्नतेचा धक्का बसलेला वृद्धेचा पतीही यावेळी माणुसकीच्या दर्शनाने गहिवरला. वयोवृद्ध महिलेचं निधन झाल्याने तिच्या नातेवाईक आणि मुलांना फोन करण्यात आला. त्यावर “आम्हाला काही सांगू नका, तुमचं तुम्ही काय करायचं ते ठरवा” असं कोरडं उत्तर आलं. सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी स्वखर्चातून तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

