कोरोनाचा हा धोका ओळखून आता नाशिक प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लोकांनी गर्दी करु नये म्हणून बाजारात खरेदीसाठी नाशिककरांना आत पास लागणार आहे.
नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात हाहा:कार उडवला आहे. रोज हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. नाशिकसारख्या मोठ्या शहरामध्ये तर ही परिस्थिती जास्तच गंभीर आहे. कोरोनाचा हा धोका ओळखून आता नाशिक प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लोकांनी गर्दी करु नये म्हणून बाजारात खरेदीसाठी नाशिककरांना आत पास लागणार आहे. या पास मोफत मिळणार असून फक्त पास असणाऱ्यांनाच बाजारपेठेत प्रवेश दिला जाईल. विशेष म्हणजे नागरिकांनी पास नसूनसुद्धा बाजारपेठेत येण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचा दंड घेतला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून होईल.
खरेदीसाठी आता पास लागणार
नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली तर आगामी दिवसांत कोरोनाला थोपवणे अवघड होणार आहे. हा धोका लक्षात घेऊन नाशिकमध्ये कडक नियम लागू करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये बाजारपेठेत खरेदी करण्याच्या नावाखाली नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. त्यामुळे येथील प्रशासनाने बाजारपेठेत येण्यासाठी पास सक्तीचे केले आहे. जवळ पास नसेल तर बाजारपेठेत येता येणार नाहीये. हा नियम मोडल्यास नागरिकांकडून 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
खरेदी करण्यासाठी फक्त एक तास
बाजारपेठांसाठी पास लागू करण्याचा निर्णय झाल्यामुळे यानंतर येथील नागरिकांना पास घेऊन फक्त एक तास बाजारपेठेत थांबता येणार आहे. एका तासात खरेदी करुन नागरिकांना बाजारपेठेच्या बाहेर पडावे लागेल. यापेक्षा जास्त वेळ थांबल्याचे आढळल्यास, प्रशासनाकडून दंड आकारला जाणार आहे. सध्या शहरातील मुख्य बाजारपेठा बॅरिकेड्सच्या साहाय्याने सील करण्यात करण्यात आल्या आहेत.
याआधी 5 रुपयांचे शुल्क घेतले जायचे
याआधी नाशिक मनपाने गर्दी टाळण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या होत्या. याआधी बाजारपेठेत यायचे असेल तर 5 रुपयांचे शुल्क मनपाकडून घेतले जात होते. मात्र तरीसुद्धा गर्दी होत असल्यामुळे या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. दरम्यान, नाशिक प्रशासनाने पास बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्यामुळे याला नाशिककरांचा प्रतिसाद कसा असेल हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

