जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत तर अवघ्या 18 तासात दोन वेगवेगळ्या ठिकाणी हत्येच्या घटना समोर आल्या आहेत.
नागपूर : नागपूर शहरात एकीकडे कोरोनाचा वणवा पेटला असताना गुन्हेगारीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. विशेष म्हणजे जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत तर अवघ्या 18 तासात दोन वेगवेगळ्या ठिकाणी हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तसेच या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
रिपब्लिकन नगरमध्ये एकाची हत्या
पहिली घटना ही रिपब्लिकन नगरमध्ये घडली. जुन्या वैमनस्यातून वडील आणि त्यांच्या दोन मुलांनी मिळून दोन जणांची निघृण हत्या केली. आरोपी देविदास जांभुळकर याने त्याची मुलं हर्षद, भुपेंद्र, शैलेंद्र यांच्या मदतीने मृतक रोहित वाघमारे, पियुष भैसरे यांची निर्घृण हत्या केली.
आरोपी जांभुळकर याला मृतक रोहित हा आपल्या चुलत भाऊ पियुषसोबत त्याच्या घरासमोरून जाताना दिसला. जांभुळकर याने त्याला रोख जुना वाद उरखून काढला. त्यानंतर रोहित आणि पियुष यांना लोखंडी सळईने मारहाण केली. या मारहाणीत रोहित याचा मृत्यू झाला. तर पियुष गंभीर जखमी झाला. पियुषच्या जबाबावरुन पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.
केटरिंगचं काम करणाऱ्या तरुणाची हत्या
संबंधित घटना ताजी असतानाच घटनास्थळापासून अवघ्या काही अंतरावर आणि काहीच वेळात केटरिंगचं काम करणाऱ्या जितू गरगणीची हत्या करण्यात आली. संबंधित घटना त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वासंशहा चौकात करण्यात आली. जितू सरळमार्गी असून त्याचे कुणाही सोबत वैर नव्हते. आई आणि दोन बहिणी असलेल्या परिवारात जितू घरचा कर्ता होता. त्यामुळे त्याची हत्या कोणी कोणत्या कारणांनी केली? याचा तपास जरीपटका पोलीस करत आहे. मात्र एकाच पोलीस स्टेशनच्या हद्दीत 18 तासात दोन हत्या झाल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.

