पोलीस आयुक्तालयात 'नो एंट्री' पण आयुक्त म्हणतात, लेखी तक्रार करा नायतर थेट मला कॉल करा!

0 झुंजार झेप न्युज

कोरोनाचा विस्फोट झाल्याने या महिन्याच्या एक तारखेपासून सर्वसामान्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत नो एंट्री करण्यात आली. त्यानंतर आठवडाभरातच त्याचा कित्ता शहर पोलीस आयुक्तालयानेही गिरवला. 

पिंपरी : कोरोनाचा विस्फोट झाल्याने या महिन्याच्या एक तारखेपासून सर्वसामान्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत नो एंट्री करण्यात आली. त्यानंतर आठवडाभरातच त्याचा कित्ता शहर पोलीस आयुक्तालयानेही आज गिरवला. त्यामुळे नागरी आणि फौजदारी तक्रारींसाठी शहरवासियांना आता काही काळासाठी का होईना कोरोनामुळे थेट गाऱ्हाणे मांडता येणार नाही.

१ एप्रिलला महापालिका कार्यालयांत नो एंट्री करताना महापालिका आय़ुक्तांनी आपल्या सर्व विभागांचे ई-मेल आयडी देऊन त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मात्र, महापालिकेकडे प्रत्यक्ष येणाऱ्या तक्रारींपेक्षा ऑनलाइन तक्रारी कमी येत असल्याचे निरीक्षण आहे. दुसरीकडे आपल्या तक्रारींची तड लागत असल्याने पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना भेटण्यासाठी दररोजच मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. मात्र, आता त्यावर आता कोरोनाने बंधन आले आहे. 

पोलीस व भेटायला येणारे नागरिक या दोन्ही घटकांच्या सुरक्षिततेसाठी आयुक्तालयातील भेटीवर तूर्त बंधन घालण्यात आले आहे. अभ्यागत व पोलीस अशा दोघांनाही कोरोना होण्याची भीती असल्याने शहरवासियांनी सहकार्याची भूमिका घेऊन कार्यालयात भेटण्यास येण्यास टाळावे, असे नम्र आवाहन कृष्णप्रकाश यांनी आज केले. अत्यावश्यक असेल तर आधी भेटीची वेळ घेऊन सर्व नियम पाळून यावे, असे त्यांनी सांगितले. तर, गंभीर तक्रारी लेखी स्वरुपात आपल्या कार्यालयाला पाठवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.

काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे कामासाठी पैशाची मागणी करीत असतील तर त्याचे रेकॉर्डिंग करून पाठवा. सबंधितांवर नक्की कारवाई होईल, असे आश्वासन कृष्णप्रकाश यांनी देताना त्यासाठी प्रत्यक्ष भेटीची गरज नसल्याचे सूचित केले आहे. कारण,अशा गंभीर तक्रारी प्रत्यक्ष भेटूनच देण्यात येत असल्याने त्यावर त्यांनी हा तोडगा काढला आहे. त्यासाठी आपला मोबाईल नंबर ९१३४४२४२४२ त्यांनी दिला आहे. शहर अवैध धंदेमुक्त ठेवण्यासाठी एक सुजाण नागरिक म्हणून सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगत त्यासाठी त्यांनी पिंपरी-चिंचवडकरांना साद घातली आहे. कुठेही अवैध धंदा दिसला,तर त्याची माहिती द्या. कारवाई नक्की होईल, याची खात्री बाळगा, अशा शब्दांत त्यांनी तक्रारदारांना आश्वस्त केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.