जगभरातील 106 देशांमधील जवळपास 53 कोटी 30 लाख फेसबुक युजर्सचा डेटा लिक झाल्याने खळबळ उडाली आहे.
वॉशिंग्टन : जगभरातील 106 देशांमधील जवळपास 53 कोटी 30 लाख फेसबुक युजर्सचा डेटा लिक झाल्याने खळबळ उडाली आहे. एका हॅकरने हा डेटा हॅक करत लिक केलाय. यामुळे 55 कोटीपेक्षा अधिक लोकांची खासगी माहिती सार्वजनिक झालीय. या माहितीत संबंधित फेसबुक युजर्सच्या फोन नंबरसह अनेक तपशीलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात भारताचाही समावेश आहे. लिक झालेल्या डेटात भारतातील 60 लाख फेसबुक युजर्सच्या माहितीचा समावेश आहे. त्यामुळे भारतातही खळबळ उडालीय.
लिक झालेल्या डेटात फेसबुक युजर्सची कोणती माहिती?
हॅकर्सने लिक केलेल्या फेसबुक युजर्सच्या माहितीत संबंधित व्यक्तीचं संपूर्ण नाव, लिंग, फोन नंबर, व्यवसाय, वैवाहिक स्थिती, रिलेशन स्टेटस, फेसबुक आयडी, फेसबुकवर आल्याची तारीख, कामाचं ठिकाण, लोकेशन, जन्मदिनांक, इमेल आणि बायो इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.
जगातील कोणत्या देशाच्या किती नागरिकांची माहिती लिक?
या 53 कोटी 30 लाख लिक डेटात अमेरिकेतील 3 कोटी 20 लाख, इंग्लंडमधील 1 कोटी 10 लाख फेसबुक युजर्सचा समावेश आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियातील 12 लाख, बांग्लादेशमधील 38 लाख, ब्राझिलमधील 80 लाख, भारतातील 61 लाख आणि अफगाणिस्तानमधील साडेपाच लाख फेसबुक युजर्सचाही या लिक डेटात समावेश आहे.
फेसबुक डेटा लिक होण्याची ही पहिलीच वेळ नाही
विशेष म्हणजे फेसबुकच्या युजर्सचा डेटा लिक होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी 2019 मध्ये पहिल्यांदा हा डेटा लिक झाला होता. त्यानंतर हा डेटा टेलिग्रामवर विकण्यात आला. त्यानंतर फेसबुकने ज्या तांत्रिक दोषामुळे हा डेटा लिक झाला त्यावर उपाययोजना केल्याचा दावा केला. मात्र, जून 2020 आणि जानेवारी 2021 मध्ये पुन्हा हा डेटा लिक झाला. त्यामुळे तांत्रिक दोष हटवल्याचा फेसबुकचा दावा फोल ठरलाय.
तुम्ही फेसबुक युजर्स असाल तर तुमचीही ‘ही’ माहिती लिक असण्याची शक्यता
Hudson Rock या सायबर सुरक्षेवर काम करणाऱ्या संस्थेचे प्रमुख अॅलोन गॅल यांनी सर्वात प्रथम हा डेटा लिकचा प्रकार उघड केलाय. त्यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली. यावेळी त्यांनी आपलं 14 जानेवारी 2021 चं जुनं ट्विट रिट्विट करत या डेटा लिकची पुनरावृत्ती लक्षात आणून दिलीय.
ते म्हणाले, “नुकतेच 53 कोटी 30 लाख फेसबुक युजर्सची माहिती लिक झालीय. त्यामुळे तुम्ही जर फेसबुक युजर्स असाल तर तुमचाही फोन नंबर लिक झालेला असण्याची शक्यता आहे. आता फेसबुक आपला निष्काळजीपणा मान्य करतं की नाही हे मी पाहतो आहे.”

