भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा विजय झाला असला, तरी भाजपच्या पॅनेलचा धुव्वा उडाला.
नांदेड : नांदेड जिल्हा बँकेवर काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने झेंडा फडकवला. निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनेलला निर्विवाद बहुमत प्राप्त झालं. 21 पैकी 17 जागांवर यश मिळवत अशोक चव्हाणांनी परिवर्तन घडवले. तर सत्ताधारी भाजपला चारच जागांवर समाधान मानावं लागलं. भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा विजय झाला असला, तरी भाजपच्या पॅनेलचा धुव्वा उडाला.
महाविकास आघाडीतील काँग्रेस 12, शिवसेना 1, तर राष्ट्रवादी 4 जागांवर विजयी झाली. यापैकी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर तर भाजपचे भास्करराव पाटील खतगावकर हे आधीच बिनविरोध निवडून आले होते.
चिखलीकर जिंकले, पण पॅनल पराभूत
लोहा मतदारसंघातून भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर विजयी झाले, तर कंधार मतदारसंघातून त्यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनीही बाजी मारली. अशोक चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आमनेसामने आल्याने दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र यावेळी चव्हाणांनी बाजी मारत लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढला.
दुसरीकडे, भाजप नेते बापूसाहेब गोरठेकर यांच्या उमरी मतदारसंघात भाजप उमेदवाराने अवघ्या तीन मतांनी निसटता विजय मिळवला. बिलोली मतदारसंघातून भाजपचे भास्करराव पाटील खतगावकर बिनविरोध विजयी झाले होते.
गोरठेकरांच्या मतदारसंघात निसटता विजय
भाजप नेते बापूसाहेब (श्रीनिवास) गोरठेकर यांचे कट्टर समर्थक राहिलेल्या कवळे पितापुत्रांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कवळे गुरुजी या नावाने जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले मारोती कवळे यांचे पुत्र संदीप उमरी मतदारसंघातून नांदेड जिल्हा बँकेच्या रिंगणात उतरले होते.
भाजप नेते बापूसाहेब गोरठेकर यांची उमरी तालुक्यात मजबूत पकड आहे. परंतु मंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठिंब्यावर उमरीत भाजपचा धुव्वा उडवण्याचा निर्धार कवळेंनी व्यक्त केला होता. परंतु त्यांना विजय मिळवता आला नाही. याआधी विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांनी गोरठेकरांना पराभवाची धूळ चारली होती. मात्र गोरठेकर आपल्या उमेदवाराच्या माध्यमातून विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढला.

