लॉकडाऊन की कठोर निर्बंध?, मंत्रिमंडळाची आज तातडीची बैठक; संध्याकाळपर्यंत नवी गाईडलाईन जारी होणार?

0 झुंजार झेप न्युज

मुंबईसह राज्यात लोकांची वाढती गर्दी काही कमी होताना दिसत नाही.


मुंबई: मुंबईसह राज्यात लोकांची वाढती गर्दी काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांची संंख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुंबईसह राज्याबाबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. आज संध्याकाळीच याबाबतची नवी गाईडलाईन जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात लॉकडाऊन लागू होणार की कठोर निर्बंध जाहीर होणार? याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 3 वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. दूरदृश्यप्रणालीद्वारे ही मिटिंग होणार आहे. आज रविवार असूनही मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावल्याने त्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यता येत आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये आजही मार्केट आणि रस्त्यावर नागरिकांची गर्दी वाढत असल्याने सरकारकडून कठोर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईसाठी वेगळा निर्णय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि राज्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जाऊ शकतात. मुंबईत मिनी लॉकडाऊन आणि राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याबरोबरच त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना लॉकडाऊन घेण्याचा अधिकार देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत होऊ शकतो. सत्ताधारी आघाडीतील मित्र पक्ष आणि विरोधी पक्षांचा लॉकडाऊनला असलेला विरोध पाहता राज्यात सरसकट लॉकडाऊन लावण्यात येणार नसल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

मुदत संपली, आता निर्णयाची वेळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी दोन दिवसांची मुदत देत असल्याचं सांगितलं होतं. ही मुदत संपली आहे. त्यानंतर आज मंत्रिमंडळाची बैठक होत असून त्यात कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उद्योजक, सिनेजगताशी चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांपासून समाजातील विविध घटकांशी संवाद साधला आहे. जीम मालक, हॉटेल व्यावसायिक, पत्रकार, संपादक, उद्योजक आणि फिल्मी जगतातील मान्यवरांशीही त्यांनी चर्चा केली आहे. त्यातून त्यांना अनेक सूचना आल्या आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी या सर्व घटकांना कोरोनाची परिस्थिती आणि त्याचं गांभीर्यही समजून सांगितलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज काय निर्णय घेतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.