Remdesivir चोरुन विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; कोल्हापूर-सोलापूरच्या दोघांना अटक
कोल्हापूर : कोरोना महामारीत जीवनदायी ठरलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. रुग्णांच्या अडचणींचा गैरफायदा घेऊन या इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज छडा लावला. याप्रकरणी संशयित योगीराज राजकुमार वाघमारे मूळ राहणार माहोळ, जिल्हा सोलापूर सध्या रा. न्यू शाहूपुरी सासणे मैदान जवळ आणि पराग विजयकुमार पाटील राहणार गणेश कॉलनी कसबा बावडा या दोघांना अटक केली. त्या दोघांकडून अठरा हजार रुपये दराने विक्री करण्याचा प्रयत्न होत असलेली 11 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केली.या प्रकरणातील त्यांचा आणखी एका साथीदाराचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू असून शासनाकडून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहेत. जीवन रक्षक उपाय योजनांची सकारात्मक फलनिष्पत्ती व्हावी यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न सुरू आहेत. या काळात अन्नधान्य औषध यांची कृत्रिम टंचाई, साठेबाजी काळाबाजार होऊ नये यासाठी पोलीस दलाची पथके कार्यरत आहेत. कोरोना आजारावर जीवनदायी ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. या इंजेक्शनचा साठा करून त्याची भरमसाठ किमतीने काळ्याबाजारात विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सावंत यांना मिळाली.
पथकासह अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने सासने मैदान येथे सापळा रचून संशयित योगीराज वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याच्यामध्ये तीन रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाटल्या मिळून आल्या. याबाबत त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी इंजेक्शने संशयित पराग पाटील त्याच्याकडून घेत असल्याचे सांगितले. त्यालाही पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे आठ इंजेक्शने मिळून आली. प्रती इंजेक्शन 18000 प्रमाणे ती विक्री करत असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत पुढे आली. इंजेक्शने जप्त करून तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब ला पाठवण्यात आली आहेत. या प्रकरणात त्यांचा आणखी एक साथीदार असून याचा पोलिस शोध घेत आहेत.
संशयित योगीराज वाघमारे हा हातकणंगले तालुक्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयात बी. ए. एम. एस च्या तिसऱ्या वर्गात शिकत आहे. तसेच संशयित पराग पाटील हा एका मेडिकल मध्ये काम करतो अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

