ओबीसी आरक्षणासाठी मुलुंड टोल नाक्यावर भाजपकडून चक्का जाम, आशिष शेलार पोलिसांच्या ताब्यात

0 झुंजार झेप न्युज

ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपच्या वतीने राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

मुंबई : ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपच्या वतीने राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. मुंबईत मुलुंड टोल नाक्यावर भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा नेते आणि विधानसभा मुख्य प्रतोद आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करुन चक्का जाम केला. “ओबीसी कें सन्मान में भाजपा मैदान में…” असा नारा देत ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले, असल्याचे भाजपकडून सांगण्यात आलं आहे.

यावेळी खासदार मनोज कोटक, आमदार मिहीर कोटेजा, पराग शाह, पालिका गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नील सोमय्या, नगरसेविका बिंदू त्रिवेदी, रजनी केणी, जागृती पाटील आदींसह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठाण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक रोखत हे आंदोलन करण्यात आले. अखेर पोलिसांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांना अटक केली आणि त्यांना नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, ठाकरे सरकारच्या उदासिनतेमुळे मराठा समाजाचे आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. जोपर्यंत दोन्ही समाजाला दोन्ही आरक्षणे मिळत नाही तोपर्यंत भाजपा रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. आजपासून या संघर्षाला सुरुवात झाली आहे. यापुढे जर आंदोलन चिघळले तर त्याला सर्वस्वी ठाकरे सरकार जबाबदार असेल.

ओबीसी आरक्षणाविरोधात ज्या दोघांनी याचिका केली ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे काँग्रेस ओबीसी आरक्षणावरुन समाजाला फसवत आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्या दोन पदाधिकाऱ्यांना काँग्रेसमध्ये मानाचे स्थान कसे? याचं उत्तर ओबीसी मंत्री विजय वड्डेटीवार यांनी द्यायला हवे, अशा शब्दांत आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.