• जिल्ह्याच्या आठही तालुक्यात पीएसए प्रकल्प उभारणार
बाह्यरुग्ण विभाग व उपचार केंद्रामुळे जालन्यातच मिळणार कर्करोगावर मोफत उपचार-पालकमंत्री राजेश टोपे
जालना,दि. 25: जालना जिल्ह्याच्या आठही तालुक्यामध्ये हवेतुन ऑक्सिजन शोषुण घेणाऱ्या व त्यावर प्रकिया करुन शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पीएसए प्लँटची उभारणी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.
हवेतुन ऑक्सिजन शोषुण त्यावर प्रकिया करुन शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पीएसए (Pressure Swing Adsorption) या ऑक्सिजन निर्मिती प्लँटचा शुभारंभ तर प्रयोगशाळेत नव्याने उभारण्यात आलेल्या स्वयंचलित रसायनशास्त्र विश्लेषक (Fully Automated Chemistry Analyser) व कर्करोग बाह्यरुग्ण विभाग व उपचार केंद्राचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा श्रीमती संगिता गोरंट्याल, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, प्र. पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उप विभागीय अधिकारी श्री सानप, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रताप घोडके,डॉ. पद्मजा सराफ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, जिल्हा वार्षिक येाजनेच्या माध्यमातुन 80 लक्ष रुपये खर्च करुन हवेतुन ऑक्सिजन शोषुण त्यावर प्रकिया करुन शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पीएसए ऑक्सिजन प्लँटची उभारणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात करण्यात आली आहे. हा प्लँट अत्यंत आधुनिक असुन 600 लिटर प्रति मिनिट ऑक्सिजन निर्मिती यातुन होण्याबरोबरच दरदिवशी 125 जम्बो सिलेंडर भरण्याची क्षमता या प्लँटमध्ये आहे. जालना जिल्ह्यात अनेक स्टील उद्योगांनी ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या प्लँटची उभारणी केली असुन जालना जिल्हा हा ऑक्सिजन निर्मितीमध्ये स्वयंपुर्ण झाला असल्याचे सांगत जालना जिल्ह्याच्या आठही तालुक्यामध्ये डीआरडीओ, एसडीआरएफ, सीएसआर तसेच जिल्हा नियोजन मंडळातुन आधुनिक असे पीएसए प्लँट उभारण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.50 रुग्णांच्या 360 प्रकारच्या विविध चाचण्या करणाऱ्या स्वयंचलित रसायनशास्त्र विश्लेषक प्रणालीचा शुभारंभ
जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रयोगशाळेमध्ये जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातुन स्वयंचलित रसायनशास्त्र विश्लेषक प्रणाली उभारण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे ब्लडशुगर, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन टेस्ट, शरीरामधील इलेक्ट्रोलाईट सोडीयम, पोटॅशियम, क्लोराईड, कॅल्शियम यासह 50 रुग्णांच्या 360 प्रकारच्या विविध चाचण्या केवळ एका तासामध्ये या प्रणालीद्वारे उपलब्ध होणार असल्याने सर्वसामान्य रुग्णांना याचा मोठा फायदा होणार असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.जिल्हा स्त्री रुग्णालयात कर्करोग बाह्यरुग्ण विभाग व उपचार केंद्राचा शुभारंभ
कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असुन या आजाराच्या प्रतिबंधासाठी तसेच या आजारावरील उपचारासाठी टाटा रुग्णालयाच्या सहकार्याने जिल्हा स्त्री रुग्णालयात कर्करोग बाह्यरुग्ण विभाग व उपचार केंद्र सुरु करण्यात आला आहे. औरंगाबाद येथे कर्करोगावर उपचार करणारे हॉस्पीटल असुन त्याचेच स्पोक मॉडेल म्हणून याठिकाणी बाह्यरुग्ण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. कर्करोगाच्या तपासणीसाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रसामग्री उपलब्ध करुन देण्यात आली असुन केमोथेरेपी व स्क्रिनिंगची सुविधाही याठिकाणी रुग्णांना उपलब्ध होणार आहे. राज्य शासन व सीएसआरच्या माध्यमातुन 30 ते 35 कोटी रुपये खर्च करुन कोबाल्ट युनिट (रेडीएशन सुविधा) ही लवकरच या ठिकाणी उभारण्यात येणार असल्याचे सांगत रुग्णांना कर्करोगाच्या उपचारासाठी ईतरत्र जाण्याची गरज भासणार नसुन जालन्यात कर्करोगारावरील उपचाराची सोय मोफत उपलब्ध झाली असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले. जिल्हा स्त्री रुग्णालयातील लसीकरण केंद्राची पालकमंत्र्यांकडून पहाणी
जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरु असलेल्या लसीकरण केंद्राला पालकमंत्री राजेश टोपे यांनी भेट देऊन लसीकरण कार्यक्रमाची पहाणी केली. कोरोनापासुन बचाव होण्यासाठी लस हीच आपली कवच कुंडले असुन जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने लसीबाबत मनात कुठलीही शंका न बाळगता लस टोचुन घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

