बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातच असणाऱ्या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’ आज दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. गेल्या वर्षी 27 जुलै 2020 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता.
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातच असणाऱ्या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’ आज दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. गेल्या वर्षी 27 जुलै 2020 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता.
8046 दशलक्ष लीटर उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष 2019 मध्ये दिनांक 12 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी म्हणजेच वर्ष 2018 मध्ये दिनांक 9 जुलै रोजी; वर्ष 2017 मध्ये दिनांक 14 ऑगस्ट रोजी आणि वर्ष 2016 मध्ये 19 जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता.
बृहन्मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी 18 दशलक्ष लीटर (1.8 कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरुन वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
तुळशी तलावाबाबत महत्त्वाची माहिती संक्षिप्त स्वरुपात पुढीलप्रमाणे
💠 बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे 35 किलोमीटर (सुमारे 22 मैल) अंतरावर हा तलाव आहे.
💠 या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन 1879 मध्ये पूर्ण झाले.
💠 या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे 40 लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.
💠 या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.76 किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 1.35 चौरस किलोमीटर एवढे असते.
💠 तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्त पाणीसाठा हा 804.56 कोटी लीटर एवढा असतो. (8046 दशलक्ष लीटर)
💠 हा तलाव पूर्ण भरुन वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते.

