जालना शहरात आवश्यक असलेल्या रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देणार

0 झुंजार झेप न्युज

• रस्त्यांची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत-पालकमंत्री राजेश टोपे

जालना,दि.23 : आपले जालना शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. सर्वांच्या सहभागातून शहराचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून शहरासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी पक्के व मजबूत रस्ते उभारण्यासाठी नगर विकास खात्यामार्फत तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध देण्याची ग्वाही देत रस्त्यांची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

कन्हैया नगर चौफुली ते बाबुराव काळे चौक या 3 कोटी 88 लक्ष रुपये किंमतीच्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर आमदार कैलास गोरंट्याल, नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल, आबासाहेब दानवे, ओम प्रकाश शेठ, कांतीलाल चोरडिया, अक्षय गोरंट्याल,रहीम अन्सारी, सतीश पंच, पुरुषोत्तम अग्रवाल, दीपजी भुरेवाल, श्रीमती सावित्रीबाई पगारे, राहुल इंगोले,सय्यद अझहर, श्रीमती संगीता पाचंगे, शेख शफीक, चंद्रशेखर नागरे, शेख महेमुद, श्री नजीब, रमेश गोरक्षक आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, जालना शहर स्वच्छ राहावे यासाठी नगरपालिकेच्या वतीने चांगल्या पद्धतीने काम करण्यात येत आहे. परंतु शहरातुन उचलण्यात आलेल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक असलेल्या घनकचरा प्रकल्पाचे काम वेगाने होण्याची गरज असून आपले शहर स्वछ व सुंदर ठेऊन शहराचा प्रत्येकाला अभिमान वाटावा या पद्धतीने काम होण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जालना जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या सुविधा अधिक चांगल्या व दर्जेदार मिळून जिल्हा आरोग्याच्या बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण व्हावा या दृष्टिकोनातून आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात आले असल्याचे सांगत जिल्हा रुग्णालयाचे अद्यावतीकरण करण्यात येऊन या ठिकाणी आरोग्याच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. रुग्णालयात सी.टी. स्कॅन मशिन व सी.आर. सिस्टीम यंत्रणा, एम.आर.आय व सोनोग्राफी, डायलेलीस सुविधा, स्टेमी प्रोजेक्ट, आदी सुविधांबरोबरच टाटा ट्रस्ट यांच्या मदतीने 25 कोटी रुपयांचा कँसर रुग्णांवर उपचारासाठीचा प्रकल्पही उभारण्यात येत असून तालुका तसेच ग्रामीण स्तरावरही आरोग्य सेवा अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

राज्यात पुणे, ठाणे, नागपूर व रत्नागिरी या चार ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्णालये कार्यरत असून सद्दस्थितीत मराठवाडा विभागासाठी एकही प्रादेशिक मनोरुग्णालय नव्हते. मानसिक रुग्णांचे आंतररुग्ण उपचार तसेच पुनर्वसन यासाठी होणारी गैरसोय टाळण्याकरीता तसेच मानसिक आरोग्य विषयक सुविधा मराठवाड्यातील जनतेला उपलब्ध होण्यासाठी जालना येथे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता देत यासाठी 104 कोटी रुपयांचा निधीही मंजुर केला आहे. मराठवाडा विभागात मनोरुग्णालय नसल्याने रुग्णांना नागपूर आणि पुणे येथे जावे लागण्याची गरज आता पडणार नसुन यामुळे या भागातील रुग्णांची मोठी सोय होणार असल्याचे सांगत या रुग्णालयाच्या ईमारतीचे काम पुर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात जालना येथे स्त्री रुग्णालय येथे 50 खाटांचे मनोरुग्णालय सुरु करण्यात आले असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले. 

आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले, जालना शहरात गत महिन्यात 22 कोटी रुपये किमतीच्या रस्त्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला असून शहरात आणखीन 11 कोटी रुपये किमतीच्या रस्त्यांच्या कामांच्या प्रशासकीय मान्यता पैकी आठ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता प्राप्त झाली आहे. शिल्लक असलेल्या कामंही मान्यता घेऊन ही कामे दर्जेदार गुणवत्ता पूर्ण करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.