गणपतीपुळेत भाविकांच्या सहकार्यानेअंगारकी चतुर्थी उत्सव संपन्न
रत्नागिरी,दि.23 : जिल्हा प्रशासन आणि पोलिस दल यांच्यासह आरोग्य विभागाने नियोजन केल्याने गणपतीपुळे येथील अंगारकी चतुर्थी यात्रा शांततेत पार पडली.कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर सर्वांना मंदिर प्रवेशाची मुभा मिळाली आहे. यानंतरची ही पहिलीच चतुर्थी होती. त्यामुळे भाविकांची गर्दी अपेक्षित होती. या गर्दीत कोरोना नियमांचे पालन करुन यात्रा पार पाडण्याची जबाबदारी होती.
दुसऱ्या बाजूला समुद्रात हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार धोका अधिक असल्याने भाविकांची सुरक्षितता देखील महत्वाची होती. या पार्श्वभूमीवर मंदिरालगत असणाऱ्या समुद्राच्या पाण्यात जाण्यास मनाई करणार आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला होता. पोलिस दलातर्फे भाविकांना समुद्राकडे जाऊ न देण्यासाठीही बंदोबस्त लावण्यात आला होता.
अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी प्रत्यक्ष स्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे व बंदोबस्ताचे नियोजन केले. आलेल्या भाविकांनीही कोरोना नियमांचे पालन करुन मोठया प्रमाणावर सहकार्य केल्याची माहिती देसाई यांनी दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातर्फे येणाऱ्या भाविकांची तपासणी तसेच ऐच्छीक लसीकरण यासाठी येथे पथक नियुक्त केले होते. येथेही भाविकांनी सहकार्य करुन तपासणी करुन घेतली.
जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. या स्थितीत बदल होवू नये व याचा अधिक फैलाव होवू नये यासाठी सर्वांनी सहकार्य केले.
