•एकाच दिवशी 450 जनावरांचे लसीकरण
वर्धा: आष्टी तालुक्यातील बेलोरा (बु) येथे जनावरांना तोंडखुरी व पायखुरीची लागण झाली होती. जनावरांचे तातडीने लसीकरण करणे आवश्यक होते. पालकमंत्री सुनील केदार यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तातडीने बेलोरा येथे उपचारासाठी पथक पाठविले. गावातील 450 जनावरांचे एकाच दिवशी लसीकरण व औषधोपचार करण्यात आले.
पालकमंत्र्यांच्या सुचनेनंतर पशुवैद्यकीय विभागाच्या पथकाने दिवसभर बेलोरा येथे थांबून जनावरांचे लसीकरण व औषधोपचार केले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकामध्ये पशुधन विकास अधिकारी डॅा.एस.एच.कांबळे, पशुधन वर्यवेक्षक बी.बी.जाणे, पी.पी.घारड, जी.ओ.चारभे, परिचर गजानन सयाम, विनोद ढेकळे यांचा समावेश होता.
बेलोरा येथील जनावरांना पायखुरी व तोंडखुरीची लागण झाल्यानंतर तातडीने औषधोपचार करणे गरजेचे होते. वेळेवर उपचार न झाल्यास इतर जनावरांनाही संसर्ग होण्याचा धोका असतो. पालकमंत्र्यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पशुवैद्यकीय विभागास तातडीने उपचाराच्या सुचना केल्या. त्याप्रमाणे आज 450 पशुंचे लसीकरण व औषधोपचार करण्यात आले. त्यात 422 गायवर्ग व 28 म्हैसवर्ग जनावरांचा समावेश आहे. शिबिराला 87 पशुपालक तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
