जनावरांपासून शेतपिकांचे नुकसान टाळण्यासाठी चांगली योजना आणू- पालकमंत्री सुनील केदार

0 झुंजार झेप न्युज

•कारंजा व आर्वी तालुक्यातील विकास कामांचे भुमिपूजन

•सावरडोह येथील पुल मंजूर करणार

•बियाने न उगवलेल्या शेतकऱ्यांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश

वर्धा,दि.13: कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार देण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी जेजे करणे आवश्यक आहे, त्या सर्व बाबी करण्यास शासनाची तयारी आहे. आजही मोठ्या प्रमाणात जंगली जणावरांपासून शेतपिकांचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी तसेच जंगली जनावरांना शेतपिकांपासून दुर ठेवण्यासाठी एक चांगला कार्यक्रम आणू, असे पालकमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

कारंजा तालुक्यातील पिपरी लिंगा येथील ग्रामपंचायत भवन बांधकामाच्या भुमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कारंजा व आर्वी तालुक्यातील विविध विकासकामांचे पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन झाले. यावेळी माजी आमदार अमर काळे, कारंजा पंचायत समितीचे सभापती चंद्रशेखर आत्राम, सरपंच चंदाताई घाडगे, उपसरपंच आशा घागरे, कारंजा न.पं.चे माजी उपाध्यक्ष नितीन दर्यापुरकर, माजी पंस सदस्य जयसिंगराव घाडगे तसेच त्या त्या गावचे सरपंच उपसरपंच उपस्थित होते. 

शेतकऱ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी हिताची कोणतीही बाब माझ्यासमोर आल्यास ती तातडीने मंजुर करण्याकडे माझा कटाक्ष असतो. शेतकरी जगला तरच आपण जगू, असे पुढे बोलतांना पालकमंत्री श्री.केदार म्हणाले. जंगली जणावरांपासून शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. ही समस्या सगळीकडेच आहे. यासाठी कायमस्वरूपी चांगला पर्याय उपलब्ध होणे आवश्यक आहे. शेती सर्वात जास्त रोजगार देणारा उद्योग आहे. त्यामुळे हा उद्योग वाढला पाहिजे, त्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज असल्याचे ते म्हणाले. 

सावरडोह येथील रस्त्यांच्या भुमिपूजन प्रसंगी बोलतांना ज्या शेतकऱ्यांचे सोयाबिन बियाने उगवले नाही, अशा शेतकऱ्यांचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू तसेच गावकऱ्यांच्या मागणीप्रमाणे पुलाचे काम मंजूर करू, असे त्यांनी सांगितले. 

पालकमंत्र्यांच्याहस्ते कारंजा तालुक्यातील पिपरी येथील जिल्हा वार्षिक योजनेतून मंजुर झालेल्या रस्त्याचे लोकार्पण, 14 लक्ष रूपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या पिपरी लिंगा येथील ग्रामपंचायत भवन बांधकामाचे भुमिपूजन, ग्रामसडक योजनेंतर्गत लिंगा मांडवी ते पिपरी या 1 कोटी 4 लक्ष रूपये तर सावरडोह ते खापरी 1 कोटी 94 लक्ष रूपये खर्चाच्या रस्त्याचे भुमिपूजन झाले.

आर्वी तालुक्यातील ग्रामसडक योजनेतून मंजुर झालेल्या 1 कोटी 13 लाख खर्चाच्या मांडला येथील तसेच अहिरवाडा ते जुना अहिरवाडा येथील 1 कोटी 2 लक्ष रूपयाच्या कामांचे भुमिपूजन करण्यात आले. भाईपुर (वाठोडा) येथील रस्त्याच्या सिमारेषेतील भुखंडाची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. या भुखंडाबाबत संबंधित भूखंडधारक व अधिकाऱ्यांशी चर्चा करून यातून भुखंडधारकांना दिलासा मिळेल, असा पर्याय काढण्याचे निर्देश दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.