जयगड बंदरजवळील बेपत्ता बोटीचा नव्याने तपास करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश

0 झुंजार झेप न्युज

जयगड बंदरजवळील बेपत्ता बोटीचा नव्याने तपास करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश

रत्नागिरी,दि.09 : जयगड बंदरानजिक बेपत्ता झालेली बोट आणि त्यातील माणसे यांचा पुन्हा शोध घेऊन या प्रकरणातील सत्य समोर आणा असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिले.

याबाबत बोलावलेल्या बैठकीत आज जिल्हाधिकारी कार्यालय समिती कक्षात त्यांनी स्थानिकांकडून माहिती जाणून घेतली आणि अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील तसेच पोलीस दल आणि कोस्ट गार्ड तसेच मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लगतच्या गावातील मच्छीमारांनी सदर बोट जिंदाल कंपनीच्या मोठया जहाजामुळे बुडाल्याची तक्रार केली आहे. मात्र बोटीचे कोणतेही अवशेष आणि त्यावरील खलाशांचे मृतदेह अद्याप हाती लागलेले नाहीत. सदर घटना 26 ऑक्टोबरच्या रात्री घडली होती. बोट भरकटली असावी असे समजून या बोटीच्या मालकाने प्रारंभी शोघ घेण्याचा प्रयत्न केला.मात्र अपयश आल्याने 72 तासांनी यात पोलिसात तक्रार करण्यात आली.

पोलिस आणि कोस्टगार्ड आपापल्या पध्दतीने यासाठी शोधमोहिम राबविली मात्र अद्यापही यात काहीच सापडलेले नाही. याबाबत नव्याने शोधमोहिम राबवावी तसेच यात अपहरणाचा प्रकार तर नाही ना याचाही तपास करण्याचे निर्देश सामंत यांनी दिले.

यातील खलाशाचा मृत्यू झाला असेल परंतु मृतदेह प्राप्त होत नसेल तर मानवीय दृष्टीकोणातून‍ जिंदाल कंपनीने 4 लाखांची भरपाई द्यावी असेही सामंत म्हणाले. सदर बंदराकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर याच कंपनीची वाहने करतात तो रस्ता पूर्ण खराब झाला आहे. याच्या दुरुस्तीसाठी कंपनीने यापूर्वी प्रमाणे बांधकाम विभागास निधी देऊन रस्ता दुरुस्त करावा अशीही सूचना उदय सामंत यांनी या बैठकीत केली.

विकास कामांचा आढावा

यानंतर अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला. गणपतीपुळे विकास आराखड्यात 102 कोटींची 19 कामे प्रस्तावित आहे. त्याच्या सद्यस्थितीबाबत त्यांनी माहिती घेतली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.