जिवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणारी भाषा म्हणजे 'गझल'-डॉ. दिलीप पांढरपट्टे Mahadgipr

0 झुंजार झेप न्युज

जिवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणारी भाषा म्हणजे 'गझल'-डॉ. दिलीप पांढरपट्टे Mahadgipr 

नाशिक,दि.4: जीवनातील प्रत्येक प्रसंग व विषय गझलेच्या माध्यमातून व्यक्त करता येत असतो. त्यामुळे गझल ही एक जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणारी भाषा आहे, असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक, गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी गझलकट्टा या कार्यक्रमात गझलेचे वर्णन केले आहे.

९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या गझलकट्टा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अँटी करप्शन ब्युरोचे पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले, संमेलन समन्वयक समीर भुजबळ, निमंत्रक व प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगांवकर, संमेलनाच्या सर्व समित्यांचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकुर, विनायक रानडे, कवी नरेश महाजन, गझलकार कमलाकर आबा देसले, खलील मोमीन, अरुण सोनवणे यांच्यासह रसिक प्रक्षेक उपस्थित होते.

सचिव गझलकार डॉ. पांढरपट्टे गझल व कवितेतील फरक सांगतांना म्हणाले की, एका कवितेमध्ये एकाच विषयाचा समावेश असतो तसे गझलमधील प्रत्येक शेर हा वेगळा असतो. रसिकांना समजेल अशा सोप्या व सरळ भाषेत गझल असावी. गझलची निर्मिती ही उर्दु भाषेमध्ये झाली असली तरी मराठी भाषेतील गझलचा प्रवास सुरेश भट यांनी सुरू केला. सुरेश भट यांच्यासोबत पत्रामार्फत झालेला पहिला संवाद, 'तुला जर चांगले मार्गदर्शन मिळाले तर तू एक उत्तम गझलकार होशील. तुझा चाहता -सुरेश भट' हा अनुभव देखील डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी कथन केला. सुरेश भट यांनी समोरच्या साहित्यिकातील क्षमता ओळखून त्यांना लिहिण्यासाठी मार्गदर्शन केले आहे, असेही गझलकार डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले.

उडवाच मान माझी, माझा नकार नाही.

इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही…. 

डॉ. पांढरपट्टे यांनी सादर केलेल्या या गझलेस प्रक्षेकांनी भरभरून दाद दिली.

गझलमंचच्या उद्घाटनानंतर सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी अभिजात मराठी भाषा दालनास भेट दिली. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत महामहीम राष्ट्रपती यांना देण्यात येणारे पत्र ही त्यांनी टपाल पेटीत टाकले.

सौंदर्याची अभिव्यक्ती म्हणजे गझल : सुनिल कडसाने

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पोलिस अधीक्षक सुनिल कडासने म्हणाले, समृद्ध व सुदृढ समाज घडविण्यासाठी संत साहित्याच्या माध्यमातून तयार झालेला भक्ती संप्रदाय प्रेरक ठरत आहे. जगामध्ये भारत असा एकमेव देश आहे ज्याने सर्व धर्मांचा व त्यांच्या सांस्कृतिचा स्विकार केला आहे. हे उर्दु गझलच्या रुपाने अनुभवास मिळते. गझलेच्या जन्माचा प्रवास सांगतांना ते म्हणाले, सौंदर्याची अभिव्यक्ती म्हणजे गझल आहे. यावेळी त्यांनी रसिक प्रेक्षकांसमोर गझल सादर केल्या.

गझलमंचच्या पहिल्या सत्रात कमलाकर आबा देसले, खलील मोमीन व अरूण सोनवणे यांनी आपल्या गझल सादर केल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.