•23 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरणाचा पहिला डोस
•पोलिओ लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
नागपूर,दि.11: 23 जानेवारी रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतून शुन्य ते पाच वर्ष वयोगटातील एकही बालक वंचित राहू नये. सर्व विभाग प्रमुखांनी पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी होवून मोहीम शंभर टक्के यशस्वी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिल्या. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान कोविड नियमावलीचे पालन करण्यासाठी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर तसेच गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासोबतच कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण करुनच बुथवर कर्मचारी नियुक्त करावे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा नियोजन पूर्व आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षा वाकोडीकर, माताबाल संगोपन अधिकारी डॉ. दावल साळवे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मडावी, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे श्री. गावंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे तसेच समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
पल्स पोलिओ लसीकरणासाठी पर्यवेक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नियमित घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला वास्तवास असलेली घरे, धाबे, शेत मजूराची बालके, पुल व इमारतीच्या बांधकामावरील मजूरांची बालके, भटक्या लोकांची बालके या शिवाय बाजाराचे दिवशी येणारी बालके यांना मोबाईल चमूद्वारे पोलिओ लस देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सदस्यांनी सांगितले.
सन 2020 मध्ये पल्स पोलिओ लसीकरण 96 टक्के झाले होते तर 2021 मध्ये ही टक्केवारी 95.80 टक्के इतकी होती. यावर्षी शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांची मदत घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
रेल्वे स्टेशन परिसरातही मोबाईल चमूद्वारे लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. राशन दुकानावरही पोस्टर व फ्लेक्सद्वारे मोहिमेचे प्रसिध्दी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या. विद्युत विभागाने या दिवशी विद्युत पुरवठा नियमित ठेवावा, असेही त्या म्हणाल्या.
23 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्यात 1 हजार 604 गावे असून शून्य ते पाच वर्षाखालील बालकांची संख्या 1 लाख 3 हजार 350 आहे. यासाठी 2 हजार 702 लसीकरण केंद्र असणार आहेत. त्याबरोबरच 1 हजार 28 ट्रांझीट टिम, 381 मोबाईल टिम, 4 हजार 948 आयपीपीआय, 36 टिम नाईट टिम व 6 हजार 302 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सादरीकरणाद्वारे सांगण्यात आले.
