नवमतदार आणि निवडणूक लोकशाहीला बळ देणारे घटक- जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार

0 झुंजार झेप न्युज

•राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम

वर्धा,दि.25: ही बाब गौरवाची असून नवमतदार आणि निवडणूक हे दोन घटक लोकशाहीला बळ देणारे घटक आहेत. त्यामुळे वयाची १८ वर्ष पूर्ण झालेल्या तरुण तरुणींनी मतदार नोंदणी करून निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले.

गो.से. वाणिज्य महाविद्यालयात मंगळवारी राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रविण महिरे, शिक्षा मंडळाचे सभापती संजय भार्गव, तहसीलदार रमेश कोळपे, गो.से. वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य अनील रामटेके, नायब तहसीलदार भगवान वनकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार पुढे म्हणाल्या, ज्या संस्थेत आज राष्ट्रीय मतदार दिनाचा मुख्य कार्यक्रम पार पडत आहे, त्या संस्थेच्या महाविद्यालयाला स्वातंत्र्य लढ्याचा वारसा आहे. लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले सरकार देश चालवित असले तरी मतदार हेच देशाचे मालक आहे. कारण तेच निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष मतदान करून बहूमताचा कौल देतात. शिवाय नवीन पिढीच्या हाती देशाचे भविष्य असून त्यांनी मतदार नोंदणी करून निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान करावे, असेही जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी यावेळी ,सांगितले. 

पारदर्शी निवडणूक व्हावी यासाठी निवडणूक आयोग वेळोवेळी प्रयत्न करीत असले तरी अचूक मतदार यादी ही त्यासाठी महत्त्वाचीच आहे. त्यामुळे नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविल्यावर आपले नाव समाविष्ट झाले काय? याची खात्री करून घ्यावी. शिवाय नवमतदारांनी केवळ मतदान कार्ड स्वत:जवळ शोभेची वस्तू म्हणून न बाळगता त्याचा वेळोवेळी निवडणुकीच्यावेळी वापर करून प्रत्यक्ष मतदान करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रविण महिरे यांनी केले.

जगात लोकशाही टिकविणे हे मोठे आवाहन आहे. इतकेच नव्हे तर जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतात आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयावर मोठी जबाबदारीच आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताने लोकशाही स्विकारली. त्यामुळे १८ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकारही मिळाला आहे. त्यामुळे तरुण-तरुणींनी मतदार नोंदणी केल्यावर प्रत्यक्ष मतदान करून लोकशाहीला बळ द्यावे, असे याप्रसंगी शिक्षा मंडळाचे सभापती संजय भार्गव यांनी सांगितले.

राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश निवडणूक व मतदान याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा आहे. आजचे नवमतदार हे उद्याच्या भारताचे भविष्य असून ते देशाचा आत्माच आहे, असे तहसीलदार रमेश कोळपे यांनी सांगितले. तत्पुर्वी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील रांगोळयांची पाहणी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केली.

सदर कार्यक्रम कोरोना नियमाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित व्यक्तींच्या उपस्थित आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे नागरिकांकरीता फेसबुकवरुन थेट प्रसारण करण्यात आले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीपर गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकाश बेले यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.