कोरोनामुळे पुणे पुन्हा निर्बंधात!

0 झुंजार झेप न्युज

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे.

पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतेय. त्याचबरोबर ओमिक्रॉनबाधित (Omicron) रुग्णांची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार(Ajit Pawar) , आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थानिक नेते आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून, निर्बंध अधिक कडक केले जाणार आहेत.

1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा बंद

पुणे शहर आणि जिल्ह्यातील 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्गांचे ऑनलाईन क्लास सुरु राहतील. तर 9वी आणि 10वीचे वर्ग ऑफलाईन पद्धतीनेच सुरु राहणार आहेत. कारण, या वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करायचे आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिलीय. तर उद्या, परवापर्यंत कॉलेजबाबतचा निर्णय होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’

उद्यापासून पुणे जिल्ह्यात सर्वत्र मॉल, खासगी तसंच सरकारी कार्यालयात कोरोना लसीचे दोन्ही डोस झाले नसतील तर प्रवेश मिळणार नाही. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस खात्याला सक्त सूचना दिल्याचही अजितदादा म्हणाले.

सार्वजनिक वाहतुकीसाठीही दोन्ही डोस बंधनकारक

पुण्यात उद्यापासून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायचा असेल तर कोरोना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक असणार आहेत. लसीचो दोन्ही डोस घेतलेले नसतील तर तुम्हाला पीएमपीएमलच्या बसमध्ये प्रवेश मिळणार नाही.

मास्क नसेल तर दंड

इतकंच नाही तर पुण्यात उद्यापासून तोंडावर मास्क लावलेला नसेल तर 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. त्याचबरोबर तोंडावर मास्क नसेल आणि तो व्यक्ती रस्त्यावर थुंकला तर त्याला 1 हजार रुपये दंड केला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 5 जानेवारीपासून होणार असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

मास्क कोणता वापरावा?

वेगवेगळ्या डिझाईनचे कापडी किंवा 2 प्लायचे सर्जिकल मास्क वापरू नका. N95 किंवा 3 प्लाय असलेल्या मास्कचाच वापर करा, असं आवाहनही अजित पवार यांनी नागरिकांना केलंय.

पुण्यातील आजची (4 जानेवारी) कोरोना स्थिती

दिवसभरात 1 हजार 104 नवे रुग्ण

दिवसभरात 151 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे शहरातील एका रुग्णाचा मृत्यू

सध्या 89 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू

पुण्यातील एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या – 5 लाख 12 हजार 689

पुण्यातील सक्रीय रुग्णसंथ्या – 3 हजार 790

पुण्यात एकूण मृत्यू – 9 हजार 119

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.