अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा महसूल पथकातील मंडळ अधिकारी सुखानंद बनसोडे यांनी ४० किलोमीटर पाठलाग करून पकडले
पैठण,(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): तालुक्यातील अवैध वाळू तस्करांचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरडपुरी येथे बुधवारी पहाटे गोदावरी नदीतून अवैधरित्या वाळूतस्करी करणाऱ्या वाहनाचा पैठण महसूल पथकाने ४० किलोमीटर फिल्मी स्टाइल पाठलाग केला. सदरील वाहन पाडळसिंगी (ता. गेवराई) जिल्हा बीड टोलनाक्याजवळ पकडण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने महसूल पथकाच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.हिरडपुरी,पैठण,पाटेगाव, दादेगाव, कावसान,नवगाव येथील परिसरातून,गोदावरी,नदीतील,अवैधरित्या वाळू तस्करी रोखण्यासाठी मंगळवारी रात्री उशिराने उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे व तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांनी महसूल विभागाचे वाळू विरोधी पथकातील मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत वाळू तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मोहीम राबवण्यासाठी वेगवेगळ्या पथकाला खाजगी वाहनातून जाऊन कारवाईचा आदेश दिला होता. त्यानुसार विहामांडवा मंडळ अधिकारी सुखानंद बनसोडे,पाचोड मंडळ आधिकारी जे.बी केकान, तलाठी राम केंद्रे, तलाठी सुधाकर निकम, कोतवाल रवींद्र सोनटक्के, सोमनाथ कोल्हे, सुरक्षा रक्षक अमोल भोसले यांचे पथक हिरडपुरी येथे गोदावरी नदीत बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास कारवाईसाठी आल्याचं लक्षात येताच अवैधरित्या वाळूने भरलेली वाहन (क्र. एमएच १६ सीओ १०७५) हे मिनीट्रक पळवून घेऊन गेले. यावेळी ४० किलोमीटर अंतरावर पाडळसिंगी (ता. गेवराई) टोलनाक्याजवळ सदरील महसूल पथकाने पाठलाग करून वाहन पकडले.
यावेळी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाने पथकाच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवानं कुठलीही अनुचित घटना यावेळी घडली नाही अशी माहीती पथकातील कर्तव्य दक्ष मंडळ अधिकारी सुखानंद बनसोडे यांनी दिली,व तसेच उपविभागीय अधिकारी डॉ स्वप्नील मोरे व तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांनी घटनेची माहिती घेऊन सदरील वाहन जप्त करून पैठण येथील तहसील कार्यालयात जमा करण्याच्या सूचना पथकातील कर्तव्य दक्ष मंडळ अधिकारी सुखानंद बनसोडे यांना दिल्या. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येईल, अशी माहिती यांनी दिली आहे.
